सिद्धार्थ उद्यान, प्राणिसंग्रहालयात अपंगांना मोफत प्रवेश, पार्किंगही

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 एप्रिल 2018

औरंगाबाद - अपंगांच्या विविध मागण्यांसाठी प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटनेतर्फे आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी (ता. १८) महापालिकेत घेराव आंदोलन करण्यात आले. महापौर नंदकुमार घोडेले यांनी शिष्टमंडळासोबत चर्चा करून मंगळवारपासूनच सिद्धार्थ उद्यान व प्राणिसंग्रहालयात अपंगांना प्रवेश आणि पार्किंग मोफत सुरू करण्याचा निर्णय घेतला. 

महापालिका मुख्यालयासमोर सकाळी अकरा वाजता आंदोलनाला प्रारंभ झाला. आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करीत परिसर दणाणून सोडला; मात्र या वेळी एकही पदाधिकारी हजर नसल्याने आंदोलकांना साडेबारापर्यंत ताटकळावे लागले. महापौरांचे आगमन होताच बच्चू कडू यांच्यासह शिष्टमंडळाने त्यांच्यासोबत चर्चा केली. शिवसेनेचे महानगरप्रमुख प्रदीप जैस्वाल, नरेंद्र त्रिवेदी, सभागृहनेते विकास जैन, उपायुक्त रवींद्र निकम, लेखाधिकारी संजय पवार, संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवाजी गाडे, पारसचंद साकला, दत्ताभाऊ साळकर, सुनील हुस्के, युवराज पाटील, बंडू गुंछेकर, उमेश चौधरी, जहीर शेख, विनायक यावलकर, मोहित देशमुख, सिद्धार्थ इंगळे उपस्थित होते.

अशा आहेत मागण्या 
अपंगांचा राखीव निधी वाटप करावा, अपंगांच्या नोंदी घ्याव्यात, महापालिकेचे व्यावसायिक गाळे अपंगांना द्यावेत, घरकुल योजनांचा लाभ द्यावा, पार्किंग मोफत करावी.  

अपंग भवन सुरू करा
महापौरांनी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन बंद पडलेल्या रात्रनिवारागृहात अपंग भवन सुरू करावे. हिरकणी कक्षाच्या बाजूला अपंगांना विविध सुविधा देण्यासाठी विशेष कक्ष स्थापन करावा, अशा सूचना केल्या. अपंगांना तीन कोटी निधी वाटपाचे नियोजन करण्याचे आदेशही त्यांनी या वेळी दिले.

आयुक्त नाहीत, त्यांचे नशीब! 
या वेळी बच्चू कडू म्हणाले, की अपंगांवर आंदोलन करण्याची वेळ आली ही बाब निंदणीयच आहे. पंधरा दिवसांत मागण्या मंजूर झाल्या नाहीत तर काय परिणाम होईल ते प्रशासनाने बघावे. आयुक्त नाहीत, त्यांचे नशीब अन्यथा आणखी एक गुन्हा दाखल झाला असता! उपायुक्तांना खुर्चीसहित उचलून फेकू, असा इशाराही त्यांनी दिला.

Web Title: Free access to the disabled in the Siddhartha Garden zoos and parking