ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन 

नवनाथ इधाटे
गुरुवार, 3 मे 2018

गिरीगण प्रतिष्ठान व सेवा फाउंडेशनच्या माध्यमातून पिरबावडा (ता.फुलंब्री) परिसरातील विद्यार्थ्यांना गेल्या चार वर्षापासून प्रत्येक उन्हाळ्यात मोफत स्पर्धा परीक्षेची तयारी व इंग्रजीचा पाया पक्का करण्यासाठी अतिरिक्त वर्ग भरवून विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन करण्यात येत आहे. 

फुलंब्री - ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा इंग्रजी विषयाचा पाया कच्चा राहत असल्याने त्यांच्या पुढील आयुष्यात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणीला तोंड द्यावे लागते. त्यामुळे विद्यार्थ्यांची गरज ओळखून गिरीगण प्रतिष्ठान व सेवा फाउंडेशनच्या माध्यमातून पिरबावडा (ता.फुलंब्री) परिसरातील विद्यार्थ्यांना गेल्या चार वर्षापासून प्रत्येक उन्हाळ्यात मोफत स्पर्धा परीक्षेची तयारी व इंग्रजीचा पाया पक्का करण्यासाठी अतिरिक्त वर्ग भरवून विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन करण्यात येत आहे. 

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन वेळेवर मिळत नसल्याने त्यांची भटकंती होत असते. त्यामुळे दहावी - बारावी नंतर कोणते क्षेत्र निवडावे असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडत असतो. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन व स्पर्धा परीक्षेसाठी कशी तयारी करावी, इंग्रजीचा पाया कसा पक्का करावा यासारख्या आदी विषयी गिरीगण प्रतिष्ठान व सेवा फाउंडेशन संयुक्त रित्या काम करीत आहे. गिरीगण प्रतिष्ठनचे माजी महापौर त्र्यंबक तुपे व सेवा फाउंडेशनचे डॉ.सुधाकर जाधव यांनी हा उपक्रम हाती घेऊन विद्यार्थ्यांना दिशा देण्याचे काम सुरू केलेले आहे. दर रविवारी होणाऱ्या या वर्गात पिरबावडा, आडगाव, मारसावळी, गिरसावळी, बाभूळगाव, रांजणगाव आदी गावातील विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती असती.  

गिरीगण प्रतिष्ठान व सेवा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने यंदाचे चौथे वर्ष सुरू आहे. ग्रामीण भागातील बहुतांश नागरिक शेती करीत असल्याने प्रायव्हेट क्लासेस  त्यांना परवड नाही. त्यामुळे आपल्या पाल्यात चांगली गुणवत्ता असली तरी त्यांना आर्थिक परिस्थिती अभावी काही करता येत नाही. या भागातील विद्यार्थ्यांची गुणवत्ता लक्षात घेऊन विद्यार्थ्यांच्या आयुष्याला वळण देण्याचे काम गिरीगण प्रतिष्ठान व सेवा फाउंडेशन करीत आहे. या शिकवणीचा विद्यार्थ्याना भविष्यात मोठा फायदा होणार आहे. त्यांच्यातील आत्मविश्वास जगविण्याचे काम या दोन्ही संस्था करीत आहे.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Free guidance for students from rural areas