सरकारी धोरणांचा निषेध नोंदवित लाखगंगा येथे मोफत दुध वाटप आंदोलन 

प्रवीण भाडाईत
गुरुवार, 3 मे 2018

लाखगंगा येथील दुध उत्पादक शेतकऱ्यांनी एकत्र येत शेकडो लीटर दूध संकलन केंद्रावर न नेता तसेच विक्री न करता दोन मोठ्या कढाईत उकळून प्रशासकीय अधिकाऱ्यांना वाटप केले.

पालखेड - वैजापूर तालुक्यातील (जि. औरंगाबाद) लाखगंगा येथे सरकारी धोरणांचा निषेध नोंदवित शेतकऱ्यांना त्यांचा हक्क मिळावा यासाठी गुरूवारी (ता. 3) मोफत दुध वाटप आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन 9 मेपर्यंत चालणार आहे. लाखगंगा येथील दुध उत्पादक शेतकऱ्यांनी एकत्र येत शेकडो लीटर दूध संकलन केंद्रावर न नेता तसेच विक्री न करता दोन मोठ्या कढाईत उकळून प्रशासकीय अधिकाऱ्यांना वाटप केले.

दुधाला हमीभाव 27 रुपये असताना, मात्र 13 ते 17 रूपये प्रति लिटर एवढाच भाव मिळत आहे. त्यामुळे खरचं निघत नसल्याने आंदोलन करावे लागत आहे, असे शेतकरी शेतकरी धनंजय धोर्डे यांनी सांगितले. राज्यातील शेतकरयांच्या प्रश्नांना वाचा फोडणार्या संघटनांनी राजकीय मतभेद विसरून आंदोलनास पाठिंबा द्यावा, असे आवाहन शेतकरी सुकाणू समितीचे डॉ. अजित नवले यांनी केले. याप्रसंगी येथील मारूती मंदिरात मारूतीला दुधाचा अभिषेक करून सरकारच्या वतीने उपस्थित तहसीलदार सुमन मोरे यांच्यासह प्रशासकीय अधिकाऱ्यांना उकळलेल्या दुधाचे मोफत वाटप करण्यात आले व नंतर श्रीमती मोरे यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी आमदार सुभाष झांबड, प्रशांत सदाफळ, पंकज ठोंबरे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष चंद्रकांत कटारे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. केशव मोरे यांनी सूत्रसंचालन केले.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Free Milk Distribution Against Government At Lakhganga