रिक्षातील जागेवरून वाद, मित्राने केला मित्राचा खून

सुषेन जाधव
गुरुवार, 29 ऑगस्ट 2019

आशू हा त्याचे मित्र सोहेल, इब्राहीम, रिक्षा चालक वसीम व संशयित आरोपी शेख रेहान यांच्या सोबत कंदुरीला जात होता. त्यावेळी रिक्षात जागेवरून शेख रेहान व आशू यांच्या वाद झाला. त्यानंतर रेहानने आशूवर धारदार शस्त्राने वार करून त्याला गंभीर जखमी केले. यात आशुचा मृत्यू झाला.  

औरंगाबाद : रिक्षात मागे आणि पुढे कोण बसणार या कारणावरून झालेल्या वादानंतर मित्रानेच एका युवकावर धारदार शस्त्राने वार केले. यात जखमीचा मृत्यू झाला ही घटना बुधवारी (ता. 28) मध्यरात्री सावरकर चौक पोलिस मेस समोर घडली. मोहम्मद असीफ ऊर्फ आशू (वय 23, रा. एसटी कॉलनी, फाजलपुरा) असे मृताचे नाव आहे. प्रकरणात पोलिसांनी गुरुवारी (ता. 29) सकाळी नऊदरम्यान शेख रेहान शेख पाशू (24, रा. विश्वासनगर, लेबर कॉलनी) याला अटक केली.

 
आशूची आई नरगीस बेगम मोहम्मद यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, बुधवारी रात्री नऊ वाजता त्यांचे कुटुंबीय घरात असताना आशूने मित्रांसोबत अंबड रौना परांडा येथे कंदुरीच्या कार्यक्रमाला जाणार असल्याचे सांगितले. रात्री 11 वाजता आशूला त्याच्या मित्राने फोन करून बोलावले. त्यानुसार आशू गेला. मध्यरात्री 12.30 वाजता नरगीस यांचा पुतण्या मोहम्मद काजीम याने सांगितले की, आशू हा त्याचे मित्र सोहेल, इब्राहीम, रिक्षा चालक वसीम व संशयित आरोपी शेख रेहान यांच्या सोबत कंदुरीला जात होता. त्यावेळी रिक्षात जागेवरून शेख रेहान व आशू यांच्या वाद झाला. त्यानंतर रेहानने आशूवर धारदार शस्त्राने वार करून त्याला गंभीर जखमी केले. आशूला घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे नरगीस यांना सांगितले. दरम्यान, घाटीत डॉक्‍टरांनी आशूला तपासून मृत घोषित केले. 

घटनास्थळावरून साहित्य जप्त 

प्रकरणात सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत रक्ताने माखलेले कपडे, रक्त मिश्रीत माती, दोन अंगठ्या असे साहित्य जप्त केले. 

रविवारपर्यंत पोलिस कोठडी 

संशयित रेहानला न्यायालयात हजर केले असता प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस. यू. न्याहरकर यांनी त्याला रविवारपर्यंत (ता. एक) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. प्रकणात सहाय्यक सरकारी वकील ए. व्ही. घुगे यांनी काम पाहिले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Friend murdered by a friend