अत्यावश्यक सेवा वगळता वाहनांना इंधन दिल्यास कारवाई 

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 11 April 2020

लॉकडाऊनच्या काळात अत्यावश्यक सेवा देणारे वाहन वगळता खासगी वाहनांना इंधन पुरवठा केल्यास पेट्रोलपंपधारकांवर कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी दिला आहे.  

जालना -  लॉकडाऊनच्या काळात अत्यावश्यक सेवा देणारे वाहन वगळता खासगी वाहनांना इंधन पुरवठा केल्यास पेट्रोलपंपधारकांवर कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी शनिवारी (ता. ११) दिला आहे.  

कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी जिल्ह्यात ता. २२ मार्चपासून लॉकडाऊन लागू आहे. हे लॉकडाऊन ता. ३० एप्रिलपर्यंत राहणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी शनिवारी (ता. ११) सांगितले आहे; मात्र या लॉकडाऊनच्या आदेशाचे अनेकजण उल्लंघन करीत आहेत. त्यामुळे खासगी वाहनांना इंधन पुरवठा करू नये, असे आदेश जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी ता. २७ मार्च रोजी पेट्रोलपंपधारकांना दिले होते. मात्र, तरी देखील काही पेट्रोलपंपधारक खासगी दुचाकीधारकांना पेट्रोल पुरवठा करीत आहेत. त्यामुळे जिल्हाधिकारी बिनवडे यांनी शनिवारी खासगी दुचाकी व वाहनांवर इंधन पुरवठा केल्यास कारवाईचा इशारा दिला आहे.

हेही वाचा : जालन्याच्या इतिहासात प्रथमच स्टील उद्योग बंद

पेट्रोलपंपधारकांनी अत्यावश्यक सेवा देणारे वाहन व सक्षम अधिकारी यांनी परवाना दिलेल्या वाहनांना इंधन पुरवठा करावा. सर्व शासकीय वाहनांना पेट्रोल, डिझेल भरण्यासाठी संबंधित तहसीलदारांचा परवाना असलेल्या वाहनांनाच पंपचालकांनी इंधन द्यावे. शासकीय अधिकारी, कर्मचारी, पत्रकार यांना ओळखपत्र पाहून इंधन देण्यात यावे.

हेही वाचा : बारावीची पुस्तके आता पीडीएफ स्वरूपात 

कृषी संबंधित उपकरणांना जसे ट्रॅक्टर, मिनी ट्रॅक्टर, मळणी यंत्र, हार्वेस्टर आदी यंत्रांना फक्त डिझेल देण्यात यावे. याव्यतिरिक्त खासगी वाहनांना, दुचाकीधारक यांना इंधन पुरवठा करू नये, अन्यथा दिवाणी व फौजदारी कारवाई करण्यात येईल, असे आदेश जिल्हाधिकारी बिनवडे यांनी दिले आहेत. 

दोन पेट्रोलपंप चालकांवर गुन्हा दाखल 

अंबड - लॉकडाऊन काळात अत्यावश्‍यक सेवा देणाऱ्या; तसेच परवानगी दिलेल्या घटकांच्या वाहनांनाच इंधन देण्याचे आदेश जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी दिलेले आहेत. असे असताना आदेशाचे उल्लंघन करून इतरांना इंधन देणाऱ्या दोन पंपचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  अंबड-जालना महामार्गावरील तिरुपती पेट्रोलियम येथे शनिवारी (ता. ११) दुपारी इतर नागरिकांना इंधन दिल्याप्रकरणी पंपाचे चालक अरविंद सोडाणी, पांडुरंग शिवाजी खोले, कपिल अशोक मुळे; तसेच संचारबंदी असतानाही विनाकारण पेट्रोल भरण्यास आलेले कार्तिक रंगनाथ मुळे, दिनेश बळीराम मुळे (रा. भालगाव) या संशयितांविरुद्ध अंबड पोलिस ठाण्यात पोलिस कॉन्स्टेबल संतोष मोठेबा कड यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घनसावंगी फाट्यावरील माने पेट्रोलपंप येथे शुक्रवारी (ता. १०) सायंकाळी आदेशाचे उल्लंघन करून कॅनमध्ये डिझेल देताना आढळल्याप्रकरणी मालक शरद बन्सी माने अंबड, व्यवस्थापक प्रशांत बाबासाहेब घाडगे तसेच दुचाकीवर आलेल्या संशयित प्रदीप राधाकिसन घुले, विशाल राजेंद्र घुले (रा.पावसेपांगरी) संशयितांविरुद्ध सहायक पोलिस निरीक्षक भारत बलैया यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक पोलिस निरीक्षक संतोष घोडके करीत आहेत, अशी माहिती ठाणे अंमलदार विष्णू बावस्कर यांनी दिली. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fuel for essential services vehicles