निधीवरून आधी खडाजंगी मग वाटाघाटी झाल्यावर सभा

zp sabha
zp sabha

परभणी ः जिल्हा नियोजन समितीच्या निधीवाटपावरून सत्ताधारी राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या सदस्यांत जिल्हा परिषदेच्या सभेआधीच खडाजंगी झाल्याचा प्रकार शुक्रवारी (ता.२९) पहावयास मिळाला. त्यानंतर काहीवेळात वाटाघाटी झाल्यानंतर सभेला सुरुवात झाली. मात्र, सभेत देखील निधीवाटपावरून गोंधळ झाल्याचे पहायला मिळाले. विद्यमान पदाधिकाऱ्यांच्या कार्यकाळातील अखेरची सभा असल्याने रात्री उशिरापर्यंत सभा सुरू होती.


जिल्हा परिषदेच्या कै.बाबुराव पाटील गोरेगावकर सभागृहात शुक्रवारी (ता.२९) दुपारी तीन वाजता सर्वसाधारण सभेला सुरुवात झाली. या वेळी अध्यक्षा उज्वला राठोड, मुख्य कार्यकारी अधिकारी पृथ्विराज बी.पी, उपाध्यक्षा भावना नखाते, सभापती अशोक काकडे, श्रीनिवास मुंडे, राधाबाई सुर्यवंशी, उर्मीला बनसोडे यांच्यासह विभागप्रमुख, सदस्य यांची उपस्थिती होती. 

असे घडले सभेपुर्वी बैठकांचे सत्र
सभेआधी सुरवातीला अध्यक्षांच्या दालनात सत्ताधारी गटाच्या सदस्यांची बैठक पार पडली. त्यात निधीवाटपाची चर्चा झाली. त्यानंतर लगेच अर्थ व बांधकाम सभापती अशोक काकडे यांच्या दालनात सत्ताधारी सदस्य आणि शिवसेनेच्या नाराज सदस्यांची बैठक पार पडली. मागील तीन वर्षापासून सातत्याने विरोधी सदस्यांवर अन्याय होत असल्याची भावना अनेकांनी बोलुन दाखवत सत्ताधारी सदस्यांना धारेवर धरले. जिल्हा नियोजन समितीकडून जो काही निधी येत आहे त्यात शिवसेनेच्या सदस्यांना डावलले जात असल्याचा आरोप करत शिवसेनेच्या सदस्यांनी आक्रमक भुमीका घेत निर्वाणीचा इशारा दिला आहे. त्यानंतर सभा सुरू झाली. 

शिवसेनेच्या सदस्यांचे निधीवाटपावरुन सत्ताधाऱ्यांवर ताशेरे 
सभेत सुरुवातीपासून शिवसेनेच्या सदस्यांनी जिल्हा नियोजन समितीच्या निधीवाटपावरुन सत्ताधाऱ्यांवर ताशेरे ओढण्यास सुरुवात केली. नियोजन समितीला जे प्रस्ताव पाठवयाचे असतात त्यावर सभागृहात कोणतीही चर्चा केली जात नाही. विषय समित्यांच्या बैठकीत एका विषयावर चर्चा होते अन् दुसराच विषय नियोजन समितीकडे पाठवला जातो असा आरोप या वेळी करण्यात आला. रात्री उशिरापर्यंत सभा सुरू होती.

त्या बैठकीत आरोग्य उपकेंद्राची चर्चा
सभेआधी जी बैठक झाली त्यात नवीन आरोग्य उपकेंद्राच्या बांधकामावरुन खडाजंगी झाल्याची माहिती आहे. आरोग्य समितीला विचारात न घेता परस्पर आरोग्य उपकेंद्र मंजुर केल्याचा आरोप या वेळी करण्यात आला. ज्या गावात आधीच प्राथमिक आरोग्य केंद्र असताना तेथे उपकेंद्र मंजुर केल्याने शिवसेनेच्या सदस्यांनी संताप व्यक्त केला आहे. त्यामुळे जेथे खरोखरच गरज आहे, अशाच गावात उपकेंद्र मंजुर करावे, अशी मागणी या वेळी करण्यात आली.

सभागृह सदस्यांनी तर कार्यालय परिसर वाहनांनी गजबजला
जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेसाठी सर्व सदस्यांच्या उपस्थितीने सभागृह तर याच सदस्यांसह अधिकारी, पदाधिकारी यांच्या वाहनाने कार्यालय परिसर गजबजला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com