औरंगाबाद : मरणानंतरही महापालिकेकडून यातना 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 जुलै 2018

नारेगाव येथील दशनाम गोसावी समाजाच्या स्मशानभूमीसाठी सुमारे 20 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. मात्र अद्याप कामांना सुरवात झालेली नसल्याने रात्रीच्यावेळी मोबाईल बॅटरीच्या उजेडात अंत्यविधी उरकावे लागत आहेत.

औरंगाबाद - कचरा, पाणी, बंद पथदिव्यांमुळे शहरातील नागरिक त्रस्त असताना एखाद्याचा मृत्यू झाल्यानंतर स्मशानभूमीतही अंत्यविधीसाठी अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. नारेगाव येथील दशनाम गोसावी समाजाच्या स्मशानभूमीसाठी सुमारे 20 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. मात्र अद्याप कामांना सुरवात झालेली नसल्याने रात्रीच्यावेळी मोबाईल बॅटरीच्या उजेडात अंत्यविधी उरकावे लागत आहेत. 

दशनाम गोसावी समाजासाठी नारेगाव येथे स्मशानभूमी आहे. या ठिकाणी विविध कामे करण्यासाठी गतवर्षी 19 लाख 99 हजार 115 रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. मात्र अद्याप कामे सुरू झालेली नाहीत. स्मशानभूमीत लाईटची व्यवस्था नाही, सुरक्षारक्षक नाही. एखाद्याचा मृत्यू झाला तर रात्रीच्यावेळी मोबाईल बॅटरीच्या उजेडात अंत्यसंस्कार करावे लागतात. याबाबत समाजबांधवांनी अतिरिक्त आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांची भेट घेऊन चर्चा केली होती. त्यानंतरही फाइल जागची हालली नाही. त्यामुळे महापालिकेच्या निष्क्रियतेच्या विरोधात मोर्चा काढण्यात येईल, असे योगेश बन, किरण गिरी, बंडू पुरी, कृष्णा गिरी, विठ्ठल पुरी, धीरेंद्र पुरी यांनी प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे.
 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Funeral is performed in mobile light in Naregaon

टॅग्स