गजानन महाराज मंदिर चौकात वाहतुकीचा "खेळ'

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 4 एप्रिल 2017

औरंगाबाद - शहरातील वाहतूक समस्या भीषण असून नागरिक मेटाकुटीला आले आहेत. त्यातच गजानन महाराज मंदिरासमोरील चौकात वाहतुकीचा दिवसभर खेळखंडोबा सुरू असतो. वाहतूक नियमांचा सर्रास भंग करून अनेक दिवसांपासून असाच खेळ सुरू आहे, परिणामी चहूबाजूंनी कोंडी होत आहे.

औरंगाबाद - शहरातील वाहतूक समस्या भीषण असून नागरिक मेटाकुटीला आले आहेत. त्यातच गजानन महाराज मंदिरासमोरील चौकात वाहतुकीचा दिवसभर खेळखंडोबा सुरू असतो. वाहतूक नियमांचा सर्रास भंग करून अनेक दिवसांपासून असाच खेळ सुरू आहे, परिणामी चहूबाजूंनी कोंडी होत आहे.

शहरात वाहतुकीची समस्या नाजूक असून सुमारे बारा लाख वाहनांची दररोज वाहतूक होते. अपुरे महत्वाचे रस्ते, कमकुवत नियोजन व अपुरे वाहतूक पोलिस यामुळे कोंडी सुटता सुटत नाही. गजानन महाराज मंदिर चौकालगत रस्त्याचे गत अनेक दिवसांपासून काम सुरू आहे. त्याचा परिणाम वाहतुकीवर होत आहे. सदोष चौक, वाहतूक सिग्नलच्या चुकीच्या जागा यामुळे नियम पाळले जात नाहीत. तसेच सकाळी साडेदहा ते बारादरम्यान व सायंकाळी पाच ते साडेनऊनंतर चौकात वाहनेच वाहने असतात. रस्त्यांच्या कामांमुळे वाहतूक संथ होत असल्याने चौकात गर्दी होत आहे. तसेच गजानन महाराज मंदिर चौकातून त्रिमूर्ती चौक, सेव्हनहिलकडे, पुंडलिकनगरकडे जाणारा मार्ग आणि सूतगिरणीकडे जाणाऱ्या रस्त्यांवर वाहनांच्या रांगा लागत आहेत. सायंकाळच्या वेळी हे रस्ते वाहनांनी भरगच्च होत आहेत. वाहतुकीच्या अशा अवस्थांमुळे वाहनधारकांना प्रचंड त्रास सोसावा लागत आहे.

भरउन्हातही कोंडीत सापडल्यानंतर लाही-लाही होते. वाहतूक कोंडीमुळे छोटे मोठे अपघातही घडत आहेत. मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या पादचारी भाविकांनाही वाहतूक कोंडीचा फटका बसत आहे. त्यांना जीव मुठीत धरून रस्ता पार करावा लागत आहे. येथील वाहतूक कोंडीकडे लक्ष द्यावे, अशी मागणी वाहनधारक व स्थानिकांकडून होत आहे.

पोलिसांची संख्या वाढवावी
गजानन महाराज मंदिर चौकात तूर्तास आठ वाहतूक पोलिस कार्यरत आहेत. परंतु सायंकाळी वाहतूक वाढत असल्याने आठ पोलिस तोकडे पडतात. तेथे नियमनासाठी एकूण बारा ते पंधरा पोलिसांची आवश्‍यकता आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांची संख्या वाढवल्यास येथील कोंडी सोडवण्यासाठी मदत होऊ शकते.

Web Title: gajanan maharaj temple chowk traffic jam