निजामाच्या राज्यातील देशभक्तांचा गणेशोत्सव

संकेत कुलकर्णी 
सोमवार, 17 सप्टेंबर 2018

औरंगाबाद : निजामाच्या राज्यातील जनता रझाकारांच्या जुलमाला कंटाळली होती. इंग्रजांच्या दास्यातून भारतमातेला मुक्त करण्यासाठी देशभर लढे सुरू होते. हैदराबाद प्रांतातील जनतेला त्यात प्रत्यक्ष सहभागी होता येत नसले तरी गणेशोत्सवातून समाजजागृती तर करता येईल, असा विचार शहरातील तरुणांनी 1925 च्या सुमारास केला. मेळ्यातील पदे आणि देशभक्तीचा संदेश देणाऱ्या गणेशमूर्ती व आरास यांतून लोकांमध्ये स्वातंत्र्याची प्रेरणा जागवली. 

औरंगाबाद : निजामाच्या राज्यातील जनता रझाकारांच्या जुलमाला कंटाळली होती. इंग्रजांच्या दास्यातून भारतमातेला मुक्त करण्यासाठी देशभर लढे सुरू होते. हैदराबाद प्रांतातील जनतेला त्यात प्रत्यक्ष सहभागी होता येत नसले तरी गणेशोत्सवातून समाजजागृती तर करता येईल, असा विचार शहरातील तरुणांनी 1925 च्या सुमारास केला. मेळ्यातील पदे आणि देशभक्तीचा संदेश देणाऱ्या गणेशमूर्ती व आरास यांतून लोकांमध्ये स्वातंत्र्याची प्रेरणा जागवली. 

महाराष्ट्र शासनाने प्रसिद्ध केलेल्या 'हैदराबादचा मुक्तिसंग्राम' या पुस्तकात स्वातंत्र्यसैनिक शंकरभाई पटेल यांनी औरंगाबादच्या गणेशोत्सवाबाबत सविस्तर माहिती दिली आहे. त्याकाळी जवळपास 40 मंडळांची आरास होती. त्याचबरोबर 11 मंडळांचे मेळे होते. त्यातून कलाकार व मुले रात्रभर सुरेल आवाजात सामाजिक परिवर्तन आणि राष्ट्रीय विचारांची गीते गात. औरंगपुऱ्यात राहणारे कर्वे गुरुजी, दत्तोपंत पद्माकर बुवा, बापूराव हरसूलकर, व्यंकटेशराव धारवाडकर, शंकरलाल पुरवार, यमुनाबाई केळकर यांनी ही गीते रचलेली असत. गणेश भक्त मंडळ, हनुमान बाल गणेश मंडळ, बलभीम गणेश मंडळ, रघुवीर गणेश मंडळ, छत्रपती गणेश मंडळ व रोहिदास गणेश मंडळांचे मेळे आणि देखावे बरेच गाजले. भारत विजय गणेश मंडळाद्वारे व्याख्याने आयोजित केली जात. चित्रकार पुंडलिकराव रांजणगावकर यांनी बाबुराव जाधव, नानासाहेब जेधे, हिरुभाऊ जगताप आणि शंकरभाई पटेल यांच्या साह्यानेयांनी उभारलेल्या महात्मा गांधी आणि बॅरिस्टर जिना यांच्यातील ऐतिहासिक भेटीच्या देखाव्यामुळे शहरातील वातावरण त्याकाळी तापले होते. शहरासह पैठण वगैरे तालुक्‍यांतही सार्वजनिक गणेशोत्सव सुरू झाले. 

जयहिंद गणेश मंडळ
डॉ. शंकरलाल पुरवार आणि त्यांच्या मित्रांनी 1925 मध्ये "जयहिंद गणेश मंडळ' स्थापन करून सराफ्यात देशभक्तिपर देखावे सादर केले. 1929 मध्ये त्यांनी "हिंदमातेची मुक्तता' हा देखावा साकारला. यात छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी भारतमातेच्या पायात अडकलेली दास्याची बेडी सोडवत आहेत, असे दृश्‍य साकारले. इंग्रजरूपी सिंहाचा वध करणारा "गजवाहन गणेश' त्यांनीत साकारला. त्यापुढच्या वर्षी शिक्षणाचे महत्त्व सांगणारा देखावा करताना त्यांनी "पाटी-पेन्सील घेऊन बसलेला गणेश आणि त्याला शिकवणारी मराठमोळी पार्वती' अशी मूर्ती बनवली. या सर्व मूर्ती तेव्हा नाशिकचे प्रसिद्ध मूर्तिकार ग. ना. गर्गे यांच्याकडून बनवून आणल्या जात. 

मेळ्यांची लोकप्रिय पदे

गणपती मंडळांसमोर त्याकाळी मेळे भरत. श्रीगणेश भक्त मेळा, गणेश भक्त मंडळ, जयहिंद गणेश मंडळ राष्ट्रीय विषयांवर पत्रके छापून वितरित करीत असत. गणेश मेळ्यांमधून देशभक्ती जागृत करणारी पदे गायिली जात. 

सजलो समरांगणिं जाया। 
सौख्य त्यजुनि, जाळुनि माया ।।धृ.।। 
गांधी वसत मम हृदयिं तयाला। 
वंदुनिया, सत्याग्रह हा भाला। 
हातिं धरुनि बघ निघत रणाला। 
शोभवीन सुयशें जननीला ।।1।। 

अशी मराठी आणि हिंदी पदे स्वतः उत्तम कवी आणि निजामप्रांतीय मराठी साहित्य परिषदेचे सभासद असलेले डॉ. शंकरलाल पुरवार लिहीत. या पदांची पत्रके आणि गणेशमूर्तींची छायाचित्रे श्रीप्रकाश पुरवार यांनी जपून ठेवली आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ganesh Utsav of patriots in the state of Nizam