शाळेसमोरील खांबात विद्युतप्रवाह, विजेच्या धक्‍क्‍याने विद्यार्थी जखमी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 16 नोव्हेंबर 2019

विजेचा धक्का लागून विद्यार्थी जखमी झाल्याची घटना शुक्रवारी (ता. 15) सकाळी साडेनऊ वाजता शिरोडी (ता. गंगापूर) येथील प्राथमिक शाळेत घडली. विद्यार्थ्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

लिंबेजळगाव (जि.औरंगाबाद ) : विजेचा धक्का लागून विद्यार्थी जखमी झाल्याची घटना शुक्रवारी (ता. 15) सकाळी साडेनऊ वाजता शिरोडी (ता. गंगापूर) येथील प्राथमिक शाळेत घडली. विद्यार्थ्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अंबेलोहळ केंद्रीय प्रशालेअंतर्गत असलेल्या शिरोडी येथे प्राथमिक प्रशाला आहे.

शाळेच्या मैदानावर खेळाच्या तासिकेदरम्यान विद्यार्थी खेळत असताना विद्युतप्रवाह उतरलेल्या खांबाचा स्पर्श झाल्याने विद्यार्थी गंभीर जखमी झाला.शालेय व्यवस्थापन समितीने हा खांब इतरत्र हलवण्याच्या मागणीचे निवेदन 5 ऑगस्ट रोजी तुर्काबाद खराडी (ता. गंगापूर) येथील उपकार्यकारी अभियंत्यांना दिले होते.

हेही वाचा-पैठण तालुक्यात तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

मात्र अद्यापही विद्युतखांब हटविण्यात आला नाही. शुक्रवारी (ता. 15) नेहमीच्या वेळेत शाळा भरून विद्यार्थी आवारात होते. सकाळी साडेनऊच्या सुमारास शाळेतील विद्यार्थी वेदांत भारत फोलाने याचा विद्युतप्रवाह उतरलेल्या खांबाला स्पर्श झाला. यामुळे तो बेशुद्ध पडला.

हेही वाचा-कन्याशाळेत लैंगिक समस्यांची हीच ती जाहिरात

वेदांतला पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शालेय समितीने शुक्रवारी पुन्हा नव्याने संबंधित कनिष्ठ अभियंत्यांना एक निवेदन देऊन संबंधित खांब दुसरीकडे हलविण्याची मागणी
केली आहे. विशेष म्हणजे चार वर्षांपूर्वीही याविषयीचे एक निवेदन संबंधित कनिष्ठ अभियंत्यांना दिल्याचे दत्तात्रय बोबडे यांनी सांगितले. महावितरणच्या दुर्लक्षामुळे ही घटना घडल्याचा आरोप ग्रामस्थांसह शालेय समितीने केला आहे. निवेदनावर शालेय समितीचे अध्यक्ष बद्रीनाथ गुंडाळे, मुख्याध्यापक एकनाथ चौधरी, सदस्य सुनील फोलाने, जनार्दन गुंडाळे, संतोष वैद्य, योगेश औटे या ग्रामस्थांच्या सह्या आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gangapur Electric Shock Injured Student