अभियंत्याने नोकरी सोडून घेतली उद्योगात भरारी

बाळासाहेब लोणे 
रविवार, 28 जानेवारी 2018

नोकरीत अडकून पडायचे नाही, कोणाची चाकरी करायची नाही असा माझा दृढ निश्‍चय होता. त्यादृष्टीने प्रयत्न करीत राहिलो. आज चाळीस जण माझ्याकडे काम करतात. इच्छाशक्ती, मेहनत, नियोजनाच्या आधारे प्रतिकूल परिस्थितीतही अपेक्षित यश मिळविता येते. प्रयत्नवादी व्यक्तीला मदतीचे हजारो हात मिळतात. माझ्या यशात आई-वडील, पत्नी यांचे खूप सहकार्य लाभले. 
- महादेव मुळे, तरुण उद्योजक

गंगापूर - सेवकाच्या मुलाने नोकरी सोडून उद्योगात भरारी घेतली आहे. या ध्येयवेड्या तरुणाने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेऊन आता मौजाबाद शिवारातील (ता. गंगापूर) बाबरगाव फाट्यावर फोर्जिंगचा उद्योग उभारून स्वतःला सिद्ध केले आहे. महादेव भानुदास मुळे असे या तरुणाचे नाव आहे. 

त्यांचे वडील भानुदास मुळे ढोरेगाव (ता. गंगापूर) येथील न्यू हायस्कूल शाळेत सेवक म्हणून कार्यरत होते. महादेव मुळे यांनी आधी वाळूज (ता. गंगापूर) येथील जिल्हा परिषद शाळेत व नंतर एमआयटी अभियांत्रिकी महाविद्यालयात (यांत्रीकी शाखा) पदवीचे शिक्षण घेतले. प्रत्येक वळणावर जिद्द, चिकाटीच्या बळावर त्यांनी यशाला गवसणी घातली. स्वतःच्या अंगभूत गुणवैशिष्ट्यांमुळे प्रतिकूल परिस्थितीवर मात केली. त्यामुळेचज गुरुजनांचे ते आदर्श विद्यार्थी बनले. कठोर परिश्रम घेत त्यांनी चांगल्या गुणांनी बी.ई.ची पदवी मिळविली.

आता त्यांच्या स्वप्नांना पंख फुटले. शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी औरंगाबाद येथील एका नामांकित कंपनीत नोकरी केली. मात्र, नोकरी न करता स्वतः काहीतरी निर्माण करण्याची जिद्द होती. याच ऊर्मीतून त्यांनी वाळूज येथे भाडेतत्त्वावर जागा घेऊन स्वतःचा छोटा उद्योग सुरू केला. वर्ष २०१४ मध्ये स्वतःची जागा घेऊन तेथे फोर्जिंगचा उद्योग उभारला. या उद्योगासाठी त्यांनी स्टेट बॅंक ऑफ इंडियाकडून एक कोटी रुपयांचे कर्ज घेतले. या उद्योगाची सध्या तीन कोटींची उलाढाल असून, यातून चाळीस जणांना रोजगार मिळाला आहे.

Web Title: gangapur marathwada news engineer success in business