टॅंकरद्वारे जगविल्या जाताहेत फळबागा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 एप्रिल 2018

पोटच्या मुलाप्रमाणे सांभाळ केलेल्या या फळबागांना वाचविण्यासाठी कर्ज काढून टॅंकरच्या पाण्याचा वापर करत आहे.
- कृष्णा सुकासे, शेतकरी, संजरपूर

गंगापूर - तालुक्‍यातील कोरडवाहू भागातील शेतकऱ्यांनी टॅंकरच्या पाण्यावर मोसंबी, डाळिंबाच्या बागा फुलविल्या आहेत. मात्र, फळबागा वाचविण्यासाठी बागेशेजारी शेततळी उभारली. त्याच्या शेजारी विहीर खोदली. टॅंकरने आणलेले पाणी विहिरीत टाकून नंतर ते विजेच्या मोटारीने पंपिंग करून शेततळ्यात टाकण्यात येते. त्यानंतर तळ्यातले पाणी ठिबकद्वारे फळबागांना पुरविण्यात येत आहे. 

१२ ते १५ हजार लिटर क्षमतेच्या एका टॅंकरसाठी शेतकऱ्यांना तब्बल एक हजार ५०० रुपये मोजावे लागत आहेत. १०० झाडांना दिवसाला एक टॅंकर पाणी लागते. खर्चाच्या तुलनेत मिळणारा भाव याचे आर्थिक गणित बसत नसल्याने शेतकऱ्यांच्या तोंडापाशी आलेला घास हिरावून जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पाण्याची कोणतीही व्यवस्था नसताना तालुक्‍यात टॅंकरच्या पाण्यावर शेकडो एकर मोसंबी, डाळिंबाच्या बागा फुललेल्या पाहायला मिळत आहेत.

बॅंकांकडून लाखो रुपयांचे कर्ज काढून शेतकऱ्यांनी फळबागांना टॅंकरने पाणीपुरवठा सुरू केला आहे. त्यांच्या या प्रयत्नाला चांगले यश आले असून ऐन उन्हाळ्यातही डाळिंब, द्राक्षांच्या हजारो एकर बागा हिरव्यागार ठेवल्या आहेत. त्यांच्या प्रयत्नाला शासनाने हमीभावाचे बळ देण्याची गरज आहे.

शेतकऱ्यांच्या भविष्याची भिस्त
कोणत्याही फळबागेची लागवड केल्यानंतर किमान ४ ते ५ वर्षांनी उत्पन्नाला सुरवात होते. तोपर्यंत खत, आंतरमशागत, फवारणी आदींचा खर्च शेतकऱ्याला करावा लागतो. या फळबागांच्या उत्पन्नावर त्यांच्या भविष्याची सर्व भिस्त अवलंबून असते. यंदा भीषण दुष्काळामुळे तालुक्‍यातील फळबागधारक शेतकऱ्यांची स्वप्ने विस्कटण्याच्या स्थितीत आहेत. प्यायलाच पाणी नसताना फळबागांना कोठून देणार? असा प्रश्न पडला आहे.

Web Title: gangapur marathwada news water tanker Horticulture