कचऱ्याच्या डोंगराची आकाशाला गवसणी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 जून 2019

चिकलठाण्यावरच मदार 
चिकलठाणा येथील प्रकल्प सुरू होणार असल्यामुळे या ठिकाणीच गेल्या काही दिवसांपासून जास्तीचा कचरा टाकला जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. केवळ प्रभाग तीनचा कचरा या ठिकाणी टाकला जाईल, असे सांगण्यात आले होते. मात्र संपूर्ण शहराचाच कचरा आणून टाकला जात असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे होते. येथील कचऱ्यावर प्रक्रिया केली जाईल, असे आतापर्यंत २५ वेळा आश्‍वासन देण्यात आले मात्र अद्याप पूर्तता झालेली नाही, असे बाबासाहेब दहीहंडे म्हणाले.

औरंगाबाद - चिकलठाणा येथील कचरा प्रक्रिया प्रकल्प अवघ्या काही दिवसांत सुरू होणार असला तरी दुसरीकडे चारही प्रक्रिया प्रकल्पांवर कचऱ्याचे डोंगर अक्षरशः आकाशाला गवसणी घालत आहेत. पावसाळा सुरू होताच कचरा भिजून त्यातून निघणाऱ्या पाण्यामुळे परिसरातील शेतीला धोका असल्याची कैफियत बुधवारी (ता. पाच) परिसरातील शेतकऱ्यांनी मांडली. 

कचराकोंडीनंतर गेल्या १६ महिन्यांत महापालिकेला एकमेव चिकलठाणा येथील प्रक्रिया प्रकल्पाचे काम मार्गी लावता आले. असे असले तरी या प्रकल्पाशेजारीच सुमारे ४० ते ५० हजार टन कचऱ्याचा डोंगर साचला आहे. असेच डोंगर हर्सूल, पडेगाव व कांचनवाडी येथील प्रक्रिया प्रकल्पांजवळ तयार झाले आहेत.

पावसाळा तोंडावर आलेला असताना या कचऱ्यावर अद्याप प्रक्रिया सुरू झालेली नाही. त्यामुळे बुधवारी चिकलठाणा परिसरातील शेतकऱ्यांनी आयुक्त डॉ. निपुण विनायक व घनकचरा व्यवस्थापन विभागप्रमुख नंदकिशोर भोंबे यांना कचऱ्याचे डोंगर कधी हटणार, अशी विचारणा केली. आज थोडासा पाऊस पडला, तरी कचऱ्याला दुर्गंधी सुटली. उद्या मोठा पाऊस झाला तर कचऱ्याचे लिचेड शेतात येईल. त्यामुळे तातडीने मार्ग काढा, अशी मागणी त्यांनी केली. लिचेड शेतात जाणार नाही. त्याची काळजी घेऊ, असे आश्‍वासन देत भोंबे यांनी शेतकऱ्यांच्या तावडीतून आपली सुटका करून घेतली. यावेळी संतोष रिठे, दिगंबर कावडे, अंकुश कावडे, संतोष गोटे, विजय जाधव यांची उपस्थिती होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Garbage Issue in Aurangabad