दगडफेक करणाऱ्या नगरसेवकाचा अहवाल आयुक्तांना सादर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 3 मे 2018

औरंगाबाद - हर्सूल-सावंगी येथे कचरा टाकण्यास विरोध करत भाजप नगरसेवक पूनम बमणे यांनी महापालिकेच्या वाहनांवर दगडफेक केली होती. याप्रकरणी बुधवारी (ता. दोन) अतिरिक्त आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग व घनकचरा विभागप्रमुख विक्रम मांडुरके यांनी प्रभारी आयुक्त उदय चौधरी यांना अहवाल सादर केला आहे. दरम्यान, श्री. मांडुरके यांनी रात्री हर्सूल पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

मध्यवर्ती जकात नाका येथे साचलेला कचरा हर्सूल-सावंगी येथे हलविण्याचा निर्णय महापालिकेने घेतला होता. त्यानुसार शनिवारी (ता. २८) वाहने कचरा खाली करत असताना भाजप नगरसेवक पूनम बमणे व त्यांच्या कार्यकर्त्यांनी विरोध करत वाहनांवर दगडफेक केली. यात एका ट्रकच्या समोरच्या काचा फुटल्या. यावेळी श्री. मांडुरके व श्री. बमणे त्यांच्यात बाचाबाची झाली होती.

अतिरिक्त आयुक्तांनी समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र कचरा टाकण्यास विरोध करत मांडुरके यांच्यासह महापालिका अधिकाऱ्यांना धक्काबुक्की करत धमक्‍या देण्यात आल्या. पदाधिकाऱ्यांनी मात्र याबाबत मौन धारण केले असताना बुधवारी प्रभारी आयुक्त श्री. चौधरी यांची भेट घेत अधिकाऱ्यांनी अहवाल सादर केला. त्यानुसार त्यांनी तक्रार दाखल करण्याच्या सूचना केल्या. मांडुरके यांनी रात्री हर्सूल पोलिस ठाण्यात तक्रार दिल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

कचऱ्याची आग पाहून पालकमंत्री भडकले 
शहरात कचऱ्याला आगी लावण्याचे प्रकार सुरूच आहेत. मंगळवारी (ता. एक) पालकमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्यासमोरच मध्यवर्ती बसस्थानक परिसरात कचरा पेटला. त्यामुळे संतप्त झालेल्या पालकमंत्र्यांनी तातडीने अग्निशमन दलाला पाचारण करीत आग लावणाऱ्यांवर गुन्हे नोंद करण्याचे आदेश दिले. विशेष म्हणजे कचऱ्याची आग आटोक्‍यात आल्यानंतरच त्यांनी घटनास्थळ सोडले दरम्यान, महापालिकेने अनोळखी व्यक्तीच्या विरोधात तक्रार दिली आहे, असे अतिरिक्त आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांनी सांगितले.

Web Title: garbage issue corporator stone attack on municipal vehicle