दुसरीकडे कचरा टाकला तेव्हा तुम्हाला चांगले वाटले!

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 29 एप्रिल 2018

औरंगाबाद - कांचनवाडी, नक्षत्रवाडीत कचरा टाकल्यानंतर तुम्हाला चांगले वाटले. मिटमिट्यात लाठीहल्ला झाला तेव्हा काही वाटले नाही आणि आता हर्सूल येथे कचरा टाकल्यानंतर त्रास का होतो? शहराच्या भल्यासाठी त्रास सहन करा, अशा शब्दांत महापौर नंदकुमार घोडेले यांनी भाजपच्या नगरसेवकांसह विरोध करणाऱ्यांना खडसावले. 

औरंगाबाद - कांचनवाडी, नक्षत्रवाडीत कचरा टाकल्यानंतर तुम्हाला चांगले वाटले. मिटमिट्यात लाठीहल्ला झाला तेव्हा काही वाटले नाही आणि आता हर्सूल येथे कचरा टाकल्यानंतर त्रास का होतो? शहराच्या भल्यासाठी त्रास सहन करा, अशा शब्दांत महापौर नंदकुमार घोडेले यांनी भाजपच्या नगरसेवकांसह विरोध करणाऱ्यांना खडसावले. 

हर्सूल येथील विरोधानंतर मार्ग काढण्यासाठी महापौरांनी त्यांच्या दालनात तातडीने बैठक बोलावली. सभापती गजानन बारवाल, उपमहापौर विजय औताडे, नगरसेवक पूनमचंद बमने, अतिरिक्त आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग, घनकचरा व्यवस्थापन कक्षप्रुमख विक्रम मांडुरकेंसह हर्सूल गावातील नागरिक उपस्थित होते. उपमहापौर औताडे व पूनम बमने यांनी सावंगीमधील जागेवर कचरा आणू नका अशी भूमिका घेतली. बमने यांनी तिथे पाणीपुरवठा करणारी विहीर आहे. पाणी दूषित होऊन जीवितहानी झाली तर कोण जबाबदार? याला आमचा विरोध आहे असे सांगितले. उपमहापौर औताडे यांनी हर्सूल सावंगीच्या जागेवर आता कचरा टाकणे बंद करा. टाकलेल्या कचऱ्यावर तात्काळ प्रक्रिया करा. आता पडेगावला कचरा टाका. एकाच ठिकाणी जास्तीचा कचरा टाकणे आम्ही सहन करणार नाही असे सुनावले. 

त्यांचा पवित्रा पाहून महापौर भडकले. कचऱ्यावर प्रक्रियेसाठी ७ जागा निश्‍चित केल्या आहेत. याची यादी शासनाला आणि न्यायालयातही दिली आहे.

त्या सात जागांमध्ये हर्सूल सावंगीचाही  समावेश आहे. त्यामुळे या जागेवर कचरा टाकावा लागणार आहे. नागरिकांनी त्याला सहकार्य केले पाहिजे. कांचनवाडी, झाल्टा येथे कचरा टाकला तेव्हाही तुम्हाला बरे वाटले.

मिटमिट्यामध्ये लाठीहल्ला झाला तेव्हा तुम्हाला चांगले वाटले. आता तुमच्याकडे कचरा टाकण्यात येत आहे, तर त्याचा तुम्हाला त्रास होतो, असा सवाल करून शहराच्या हितासाठी तुम्हाला थोडा त्रास सहन करावा लागेल. प्रशासन नुसता कचरा टाकणार नाही, तर त्यावर लगेच प्रक्रिया करणार असल्याने तुम्हाला प्रशासनाला सहकार्य करावेच लागेल, असे त्यांनी खडसावले.

Web Title: garbage issue harsul savangi agitation