कचऱ्याच्या वाहनांवर हर्सूलमध्ये दगडफेक

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 29 एप्रिल 2018

औरंगाबाद - गेल्या दोन दिवसांपासून झाल्टा शिवारात कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी किरकोळ वाद वगळता शांततेत सुरवात झाली. मात्र, शनिवारी (ता. २८) हर्सूल-सावंगी तलाव परिसरात नियोजित ठिकाणी कचरा टाकण्याला भाजप नगरसेवक पूनमचंद बमणे आणि त्यांच्या समर्थकांनी तीव्र विरोध केला. कार्यकर्त्यांसह नागरिकांनी कचऱ्याची काही वाहने दगडफेक करून परतवून लावली. तर नगरसेवक बमणे यांनी चक्‍क घनकचरा व्यवस्थापन कक्षप्रमुख विक्रम मांडुरके यांच्या अंगावर धावून जाऊन त्यांना धमकावले. 

औरंगाबाद - गेल्या दोन दिवसांपासून झाल्टा शिवारात कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी किरकोळ वाद वगळता शांततेत सुरवात झाली. मात्र, शनिवारी (ता. २८) हर्सूल-सावंगी तलाव परिसरात नियोजित ठिकाणी कचरा टाकण्याला भाजप नगरसेवक पूनमचंद बमणे आणि त्यांच्या समर्थकांनी तीव्र विरोध केला. कार्यकर्त्यांसह नागरिकांनी कचऱ्याची काही वाहने दगडफेक करून परतवून लावली. तर नगरसेवक बमणे यांनी चक्‍क घनकचरा व्यवस्थापन कक्षप्रमुख विक्रम मांडुरके यांच्या अंगावर धावून जाऊन त्यांना धमकावले. 

महापालिकेने गेल्या दोन दिवसांपासून सुमारे ८० ट्रक कचरा हर्सूल-सावंगी तलावाच्या बाजूच्या परिसरात टाकायला सुरवात केली होती. नियोजनाप्रमाणे शनिवारी कचऱ्याने भरलेली वाहने हर्सूल-सावंगी येथे महापालिकेने आणली. तेथे कचरा रिकामा करीत असतानाच नगरसेवक बमणे हे कार्यकर्ते व नागरिकांसह पोचले आणि कचरा टाकण्याला विरोध केला. मात्र, त्याकडे लक्ष न देता कचरा टाकला जात असल्याने त्यांनी समर्थकांसह थेट वाहनांवर दगडफेक सुरू केली. त्यात एका ट्रकच्या समोरची काच फुटली. यावेळी उपस्थित अधिकारी विक्रम मांडुरके यांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, बमणे हे काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. उलट ते अधिकारी मांडुरके यांच्या अंगावर धावून गेले. यावेळी दोघांत चांगलीच बाचाबाची झाली. 

अतिरिक्‍त आयुक्‍त श्रीकृष्ण भालसिंग यांनीही बमणे व इतरांना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, विरोधाची धार पाहून कचऱ्याने भरलेली २०-२५ वाहने परत सेंट्रल नाका येथे पाठविण्यात आल्याचे श्री. मांडुरके यांनी सांगितले. 

असे काही घडलेच नसल्याचा पवित्रा
औरंगाबाद - कचऱ्याला आगी लावणाऱ्या नागरिकांवर महापालिका प्रशासनाने गुन्हे दाखल केले आहेत. मात्र आता चक्‍क सत्ताधारी भाजप नगरसेवकानेच कचऱ्याच्या वाहनांना दगडफेक करून विरोध केला. 
यापूर्वी अतिक्रमण हटावच्या कारवाईला विरोध करताना विरोधी पक्षनेता फेरोज खान यांच्यासह एमआयएमच्या पाच नगरसेवकांवर कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे. आता बमणे यांच्यावर कारवाईचे आदेश महापौर घोडेले देणार का, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. या प्रश्‍नावर उत्तर देण्याचे महापौर घोडेले व उपमहापौर विजय औताडे यांनी टाळले.  असे काही झालेच नाही, असा पवित्रा त्यांनी घेतला आहे.

हर्सूल सावंगी तलावाशेजारी तीन-चार विहिरी आहेत. यातून शहरातील दोन वॉर्डांना पाणीपुरवठा होतो. कचऱ्यामुळे पावसाळ्यात येथील पाणीपुरवठा दूषित होण्याचा धोका आहे. मी न्यायालयाचा मानसन्मान राखतो; मात्र पाणी दूषित होणे परवडणारे नाही, यासाठी विरोध केला.
- पूनमचंद बमणे, नगरसेवक, भाजप 

न्यायालय व शासनाकडे डीपीआरमध्ये हर्सूल येथे कचरा टाकण्याचे नियोजन केलेले आहे. त्याप्रमाणे त्या नियोजित जागेत प्रक्रियेसाठी कचरा टाकावाच लागेल. तोडगा निघाला नाहीच तर पोलिस बंदोबस्तात कचरा टाकला जाईल.
- विक्रम मांडुरके, घनकचरा व्यवस्थापन कक्षप्रमुख

Web Title: garbage issue vehicle attack harsul savangi stone attack agitation