औरंगाबादमध्ये कचऱ्याचे नवे डोंगर अडीच लाख टनांवर

माधव इतबारे
रविवार, 1 सप्टेंबर 2019

  • चिकलठाणा, पडेगाव, हर्सूल, कांचनवाडीतील स्थिती 
  • तब्बल 45 कोटींचा निधी, तरीही प्रक्रिया थांबली 

औरंगाबाद - शहरात निघणाऱ्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी शासनाने महापालिकेला आतापर्यंत 45 कोटी रुपयांचा निधी दिला. त्यात चिकलठाणा येथील एकमेव प्रकल्प सुरू झाला असला तरी चिकलठाण्यासह हर्सूल, पडेगाव व कांचनवाडी येथे दीड वर्षात जमा झालेल्या कचऱ्याचे डोंगर कायम आहेत. हा कचरा सुमारे अडीच लाख टनांच्या घरात असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

नारेगाव (मांडकी) येथील कचरा डेपो बंद झाल्यानंतर महापालिकेने महिनाभर नव्या जागेचा शोध घेतला. मात्र, वाढता विरोध पाहून चार ठिकाणी कचरा प्रक्रिया प्रकल्प करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यात चिकलठाणा, हर्सूल, पडेगाव व कांचनवाडीचा समावेश आहे. पडेगाव व चिकलठाणा येथील प्रकल्प प्रत्येकी 150 टन क्षमतेचे असून हे काम मायोवेसल्स कंपनीला देण्यात आले आहे. कांचनवाडी येथे ओल्या कचऱ्यापासून गॅसनिर्मिती केली जाणार आहे. हर्सूल येथे अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित प्रकल्प उभारला जाणार आहे. यातील चिकलठाण्याचा प्रकल्प सुरू झाला असला तरी इतर प्रकल्प अधांतरीच आहेत. गेल्या दीड वर्षाच्या काळात महापालिकेने चारही ठिकाणी पत्र्याचे तात्पुरते शेड उभारून कचरा साठविला. त्यातून प्रचंड दुर्गंधी सुटल्याने परिसरातील नागरिकांनी वारंवार आंदोलने केले. त्यानंतर कचऱ्यावर प्रक्रियेसाठी सामंजस्य करार करण्यात आला. त्यानुसार कचऱ्याची दुर्गंधी कमी करण्यासाठी औषध फवारणी करण्यात आली. मात्र, या कचऱ्यावर पुढील प्रक्रिया झालेली नाही. पावसामुळे कचऱ्यातील लिचेड जमिनीत जाऊन परिसरातील विहिरींना दूषित पाणी येत असल्याचा आरोप शेतकऱ्यांतर्फे केला जात आहे. एकट्या चिकलठाणा येथील प्रकल्पात सुमारे 60 हजार टन कचरा आहे. एवढेच ढीग पडेगाव, हर्सूल, कांचनवाडी येथेही आहेत. 
 
सुधारित डीपीआरमध्ये तरतूद 
सध्या पडून असलेल्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठीच्या निधीची सुधारित डीपीआरमध्ये (सविस्तर अहवाल) तरतूद आहे. सुधारित डीपीआरला शासनाने मंजुरी दिल्याने कचऱ्यावर प्रक्रियेचे काम सुरू होईल, असे महापौर नंदकुमार घोडेले यांनी शनिवारी (ता. 31) चिकलठाणा येथील शेतकऱ्यांना सांगितले. 
 
कचरा व्यवस्थापनाची माहिती 
 

  • लोकसंख्या (2011 ची जनगणना)  : 12,28,032 
  • शहराचे एकूण क्षेत्र  : 138 वर्ग किलोमीटर 
  • शहरातील कुटुंब संख्या  : 2,30,000 
  • दररोज निघणारा कचरा : 400 ते 450 टन 
  • संकलित करण्यात येणार कचरा : 390 ते 450 टन 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: garbage problem at aurangabad