प्रक्रिया केंद्रामधील कचऱ्याला लावली आग

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 28 मे 2018

औरंगाबाद - हर्सूल-सावंगी येथील कचरा प्रक्रिया केंद्रामधील कचऱ्याला अनोळखी व्यक्तीने आग लावली. ही बाब सुरक्षारक्षकाच्या लक्षात येईपर्यंत आगीने रौद्ररूप धारण केले होते. अग्निशमन विभागाने घटनास्थळ गाठत आग आटोक्‍यात आणली. ही घटना रविवारी (ता. २७) पहाटे पाचच्या सुमारास घडली.

औरंगाबाद - हर्सूल-सावंगी येथील कचरा प्रक्रिया केंद्रामधील कचऱ्याला अनोळखी व्यक्तीने आग लावली. ही बाब सुरक्षारक्षकाच्या लक्षात येईपर्यंत आगीने रौद्ररूप धारण केले होते. अग्निशमन विभागाने घटनास्थळ गाठत आग आटोक्‍यात आणली. ही घटना रविवारी (ता. २७) पहाटे पाचच्या सुमारास घडली.

कचराकोंडी झाल्यापासून शहरात कचऱ्याला आग लावण्याचे प्रकार सुरूच आहेत. महापालिका या प्रकारांना आळा घालण्यात कमी पडत आहे. संनियंत्रण समितीने पालिकेला कचरा प्रक्रिया केंद्र उभारण्यासाठी नऊ जागा ठरवून दिलेल्या आहेत. त्यापैकी पडेगाव, चिकलठाणा, हर्सूल-सावंगी बायपास आणि कांचनवाडी येथे शहरातील संमिश्र कचरा नेऊन टाकला जात आहे. संमिश्र कचरा टाकला जात असल्याने नागरिकांचा विरोध होत आहे. तरीही महापालिका संमिश्र कचरा टाकत असल्याने आता येथेही कचऱ्याला आग लावण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. रविवारी पहाटे पाचच्या सुमारास हर्सूल-सावंगी येथील प्रक्रिया केंद्रावर अनोळखी व्यक्तींनी कचऱ्याला आग लावली. येथील सुरक्षारक्षक झोपेत असल्याने लवकर हा प्रकार लक्षात आला नाही. त्यामुळे कचऱ्याने अधिकच पेट घेतला. धुराचे लोट पाहताच सुरक्षारक्षकाने अग्निशमन विभागाला कॉल केला. तेव्हा पाच वाजून ४० मिनिटांनी चिकलठाणा येथून अग्निशमन विभागाची यंत्रणा आग आटोक्‍यात आणण्यासाठी रवाना झाली. सकाळी नऊ वाजेपर्यंत आगीवर नियंत्रण मिळाल्याचे अग्निशमन विभागातून सांगण्यात आले.

चिकलठाणा येथेही कचऱ्याला आग 
चिकलठाणा येथील केंद्रावरही कचऱ्याला अनोळखी व्यक्तीने आग लावल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे दुपारनंतर येथे कचरा टाकणे महापालिका प्रशासनाला अवघड झाले होते. काही वेळात येथील आग स्थानिक आणि पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी आटोक्‍यात आणली. त्यानंतर कचरा टाकणे सुरू झाले.

Web Title: garbage process center fire