कचऱ्याने अडविले रस्ते

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 एप्रिल 2018

औरंगाबाद - कचराकोंडीचे ५५ दिवस उलटल्यानंतरही शहरातील चित्र भयावह आहे. त्यात मंगळवारी (ता. दहा) झालेल्या पावसाने महापालिकेसमोरील अडचणी वाढविल्या असून, भिजलेल्या कचऱ्यामधून दुर्गंधी वाढल्यामुळे परिसरातील नागरिकांना जीवन जगणे कठीण झाले आहे. अनेक भागांत तर कचऱ्याचे ढीग रस्त्यांवर येऊन अर्धे रस्तेच गायब झाल्याचे चित्र आहे.

औरंगाबाद - कचराकोंडीचे ५५ दिवस उलटल्यानंतरही शहरातील चित्र भयावह आहे. त्यात मंगळवारी (ता. दहा) झालेल्या पावसाने महापालिकेसमोरील अडचणी वाढविल्या असून, भिजलेल्या कचऱ्यामधून दुर्गंधी वाढल्यामुळे परिसरातील नागरिकांना जीवन जगणे कठीण झाले आहे. अनेक भागांत तर कचऱ्याचे ढीग रस्त्यांवर येऊन अर्धे रस्तेच गायब झाल्याचे चित्र आहे.

शहरातील कचराकोंडी फोडण्यासाठी महापालिकेचे कागदोपत्री जोरदार प्रयत्न सुरू असले, तरी रस्त्यांवरचे ढीग अद्याप कायम आहेत. ५५ दिवसांनंतरही कचऱ्यावर प्रक्रिया करणाऱ्या मशीन महापालिका खरेदी करू शकली नाही. सध्या जोर आहे फक्त ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मिती करण्यावर; मात्र प्रभाग एक, दोन, तीनमध्ये घराघरांतून ओला व सुका मिक्‍स कचरा रस्त्यावर येत आहे. या कचऱ्याची विल्हेवाट लावायची कशी? याचे उत्तर अद्याप महापालिकेला मिळालेले नाही. त्यामुळे मिक्‍स कचऱ्याचे ढीग दिवसेंदिवस वाढतच आहेत.

सेंट्रल नाका, शहागंज, बसस्थानकासमोर व पदमपुरा येथे पडून असलेला कचरा संपला असला, तरी नवा कचरा या ठिकाणी जमा होत आहे. मंगळवारी झालेल्या पावसामुळे महापालिकेसमोरील अडचणीत वाढ झाली आहे. साचलेल्या कचऱ्यामधून पूर्वीच प्रचंड दुर्गंधी येत होती; मात्र पावसाने कचरा ओला झाल्यानंतर दुर्गंधीमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे ज्या भागात कचरा साचला आहे, त्या परिसरातील नागरिकांना मरणयातना सहन कराव्या लागत आहेत.

रस्त्याच्या कंत्राटदारांचा शोध 
साचलेला कचरा उचलून न्यायालयाने रस्ते स्वच्छ करण्याचे आदेश दिले असल्यामुळे प्रशासन कामाला लागले असून, हा कचरा उचलण्यासाठी दीडशे कोटींच्या निविदा भरलेल्या कंत्राटदारांना साकडे घालण्यात येत आहे. ओला-सुका मिक्‍स असलेला कचरा उचलल्यानंतर तो टाकायचा कुठे? हा प्रश्‍न मात्र अनुत्तरीत आहे. 

ऐनवेळी जबाबदारी
कचऱ्याच्या प्रश्‍नावर मंगळवारी न्यायालयात सुनावणी झाली. या वेळी न्यायालयात हजर राहण्यासाठी एका कार्यकारी अभियंत्याला ऐनवेळी सूचना करण्यात आली. न्यायालयाने विचारलेल्या प्रश्‍नाचे त्यांना समाधानकारक उत्तर देता आले नाही. त्यामुळे न्यायालयाने नाराजी व्यक्त केली.

Web Title: garbage on road