कचऱ्यावर आता रोज एक रुपया कर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 ऑक्टोबर 2018

औरंगाबाद - शहरातील साफसफाईचे खासगीकरण करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला असून, पी. गोपीनाथ रेड्डी या खासगी कंपनीला काम देण्याचा निर्णय सोमवारी (ता. २२) झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत घेण्यात आला. 

औरंगाबाद - शहरातील साफसफाईचे खासगीकरण करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला असून, पी. गोपीनाथ रेड्डी या खासगी कंपनीला काम देण्याचा निर्णय सोमवारी (ता. २२) झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत घेण्यात आला. 

सात वर्षांसाठी सुमारे २११ कोटी रुपये खर्चाची ही निविदा असून, लवकरच नागरिकांना आता रोज एक रुपया, तर व्यापाऱ्यांना रोज दोन रुपये कर द्यावा लागणार आहे. शहरातील कचराकोंडीला आठ महिने पूर्ण झाले आहेत; मात्र अद्यापपर्यंत कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यात महापालिकेला यश आलेले नाही. शासनाने ९१ कोटींचा घनकचरा व्यवस्थापनाचा डीपीआर मंजूर केल्यानंतर कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी २७ मशीन खरेदी करण्यात आल्या. दीडशे टनाच्या दोन प्रक्रिया प्रकल्पांच्या निविदा मंजूर करण्यात आल्या. त्यात सोमवारी घरोघरी जाऊन कचरा गोळा करणे व त्याची वाहतूक करण्याची निविदा प्रशासनाने स्थायी समितीच्या बैठकीसमोर मंजुरीसाठी ठेवली होती. त्याला राखी देसरडा या एकमेव सदस्याने विरोध करीत निविदा प्रक्रियेची चौकशी करण्याची मागणी केली. त्यानंतर सभापती राजू वैद्य यांनी १ हजार ८६३ रुपये प्रतिटन दराच्या या निविदेला मंजुरी दिली. निविदा मंजूर झाल्यामुळे आता नागरिकांना रोज एक रुपये, तर महिन्याला ३० रुपये, व्यावसायिकांना रोज दोन रुपये म्हणजे महिन्याला ६० रुपये साफसफाईसाठी द्यावे लागणार आहेत.

वर्षाला देणार ३० कोटी रुपये
कंत्राटदाराला पैसे कसे देणार, असा प्रश्‍न बारवाल यांनी केला. त्यावर खुलासा करताना घनकचरा विभागाचे प्रमुख नंदकिशोर भोंबे यांनी सांगितले, की कंत्राटदाराला महापालिका फंडातून महिन्याला दोन कोटी ५१ लाख, तर वर्षाला ३० कोटी ११ लाख रुपये द्यावे लागतील.

बचतगट कर्मचाऱ्यांवर येणार गदा 
महापालिका कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त महापालिकेने बचतगटासह इतर कर्मचारी कामावर घेतले आहेत. त्याचा आकडा ८३० एवढा आहे. खासगी एजन्सी नियुक्त केल्यानंतर या कर्मचाऱ्यांची सेवा थांबवावी लागेल, असे भोंबे यांनी सांगितले.

Web Title: Garbage Tax municipal