आता कचरा टाकणार पोलिस बंदोबस्तात

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 जुलै 2018

औरंगाबाद - चिकलठाणा, हर्सूल येथील प्रक्रिया केंद्रावर कचऱ्याला विरोध कायम असल्यामुळे आता पोलिस बंदोबस्त घेऊन या ठिकाणी कचरा टाकण्यात येणार आहे. चिकलठाणा येथून दोन दिवसांपूर्वी नागरिकांनी कचऱ्याच्या गाड्या परत पाठविल्या होत्या. महापौर, अधिकाऱ्यांनी नागरिकांची मनधरणी केली; मात्र उपयोग झाला नाही. त्यामुळे कचरा आता पोलिस बंदोबस्तात जाणार आहे. तसे आदेश महापौर नंदकुमार घोडेले यांनी शनिवारी प्रशासनाला दिले.

शहरातील कचराकोंडी चार महिन्यांनंतरही कायम आहे. महापालिकेने ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी पडेगाव, चिकलठाणा, हर्सूल, नक्षत्रवाडी येथील जागांची निवड केली आहे. त्यानुसार शहरात पडून असलेला मिक्‍स कचरा या जागेवर टाकून तिथे ओला व सुका असे वर्गीकरण करण्याचे आदेश विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या समितीने दिले होते. त्यानुसार महिनाभरापासून या जागेत कचरा टाकण्यात येत आहे. कचरा टाकल्यानंतर कुठलीही प्रक्रिया केली जात नसल्याने नारेगावप्रमाणे आमच्या भागात कचऱ्याचे ढीग करू नका, असे म्हणत नागरिक विरोध करत आहेत. 

कचऱ्यामुळे हर्सूल येथील सार्वजनिक विहिरीचे पाणी दूषित झाल्यापासून येथील कचरा प्रक्रिया केंद्रावर नवा कचरा गेलेला नाही. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी चिकलठाणा येथील नागरिकांनी आंदोलन करीत महापालिकेची वाहने परत पाठविली. महापौर नंदकुमार घोडेले यांनी नागरिकांची भेट घेऊन तुम्हाला त्रास होणार नाही, याची काळजी घेतली जाईल, असे आश्‍वासन दिले. त्यानंतर शहर अभियंता सखाराम पानझडे, उद्यान अधीक्षक विजय पाटील यांनी दोनवेळा नागरिकांची भेट घेऊन विनंती केली. मात्र नागरिक ऐकण्यास तयार नसल्याने महापौरांनी शनिवारी अधिकाऱ्यांना पोलिस बंदोबस्तात कचरा टाका, असे आदेश दिले.

नागरिकांचा त्रास कमी करा 
शहरातील औरंगपुरा, शहागंजसह इतर भागांमध्ये कचऱ्याचे मोठमोठे ढीग लागले आहेत. त्यामुळे परिसरातील नागरिक दुर्गंधीसह माशांच्या त्रासामुळे त्रस्त आहेत. त्यांची त्रासातून मुक्तता करण्यासाठी ज्या भागात वस्ती नाही तिथे कचरा टाकण्यास तुमची हरकत काय? अशा शब्दांत महापौरांनी अधिकाऱ्यांना फैलावर घेतले.

Web Title: Garbage throw away in police security