औरंगाबाद : म्हाडा कॉलनीत गॅस सिलिंडरचा स्फोट 

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

औरंगाबाद - धूत हॉस्पिटलजवळील म्हाडा कॉलनीत एका दुमजली इमारतीत पहिल्या मजल्यावर गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट झाला. मंगळवारी (ता. 12) पहाटे चारच्या सुमारास गॅस गळतीमुळे ही घटना घडली. स्फोटाच्या काही सेकंद आधी प्रसंगावधान राखल्याने महिलेचा जीव वाचला; तर दुसऱ्या मजल्यावर मोठा धुराळा झाल्याने दुसरी महिला अत्यवस्थ झाली. तिला अग्निशमन दलाच्या जवानांनी सुखरूप बाहेर काढले. यात एक तरुण किरकोळ भाजला. 

म्हॉडा कॉलनीत रत्नाकर कुलकर्णी यांचे दोन मजली घर आहे. ते स्वतः तळमजल्यात राहतात. पहिल्या मजल्यावर हिराबाई खरात, तर दुसऱ्या मजल्यावर वर्षा शेळके राहतात. डबा तयार करायचा असल्याने पहाटे चारच्या सुमारास पहिल्या मजल्यावर राहणाऱ्या हिराबाईंनी गॅस सुरू केला. त्यावेळी गॅसने पेट घेतला. मोठा भडका होत असल्याचे पाहून प्रसंगावधान राखून त्यांनी स्वंयपाक खोलीबाहेर धाव घेत आरडाओरड केली. याचदरम्यान अन्य खोलीतील कुटुंबीयांनी खोलीतून पटापट खाली पळ काढला. यामुळे त्यांचा जीव वाचला. काही सेकंदांतच गॅसचा मोठा स्फोट झाला. आवाजाने परिसरातील नागरिक घाबरून उठले. त्यांनी अग्निशमन दलाला घटनेची माहिती दिली. दरम्यान, स्फोटानंतर पहिल्या मजल्यावरून आगीचा मोठा धुराळा दुसऱ्या मजल्यावर पोचला. यात वर्षा शेळके (वय 50) या धुराड्यात सापडल्या. दरम्यान, अग्निशमनच्या जवानांनी दुसऱ्या मजल्यावर पोचत महिलेला सुखरूप बाहेर काढले. स्फोटात शरद खरात (वय 28) किरकोळ जखमी झाला. या घटनेत एक लाखाचे नुकसान झाले. अग्निशमनच्या चिकलठाणा उपविभाग येथील प्रभारी विनायक कदम, अनिल नागरे, सुभाष घरत, आहेरकर, शेलार निंबाळकर, वाहनचालक झाडे यांनी आग आटोक्‍यात आणण्यासाठी प्रयत्न केले. 

सिलिंडरचे झाले तुकडे 
स्फोट एवढा भीषण होता, की स्वंयपाक घरातील साहित्य अस्ताव्यस्त पडले. गॅस सिलिंडर फुटून पूर्ण चापट झाले. सर्व घरात धूर आणि गॅस पसरला होता. 
बचावात्मक उपाय व अग्शिनमन दलाच्या जवानांच्या प्रयत्नामुळे आग आटोक्‍यात आली. 
 
ते दृश्‍य भयानक... 
चिकलठाणा अग्निशमन उपविभागाचे प्रभारी विनायक कदम यांनी सांगितले, की अत्यंत भयावह दृश्‍य होते. म्हाडा कॉलनीत आपत्तीग्रस्तांना वाचविण्यात यश आले. वाहन आत जाण्यास अडचणी आल्या. पहाटेची वेळ होती. अरुंद रस्ते आणि वाटेतच वाहने असल्याने मोठी पंचाईत झाली होती. घराजवळ पोचल्यानंतर आत जाण्यासही छोटीच वाट होती. तेथील भिंतही पडली. मोठा स्फोट असल्याने इण्डेन गॅस सिलिंडरच्या चिंधड्या उडालेल्या दिसल्या. घराजवळ गेल्यानंतर कोण कोणत्या खोलीत आहे, किती लोक आत अडकले आहेत याचा अंदाज लागत नव्हता. कुणी सांगतही नव्हते. दुसऱ्या मजल्यावर गेल्यानंतर धुरात सापडलेली महिला दरवाजा उघडायला तयार नव्हत्या; परंतु अग्शिशमन दलाचे जवान असल्याचे समजताच त्यांनी थरथरत दरवाजा उघडला. त्यांना धीर देत सुखरूप बाहेर काढले. महिन्यापूर्वीही देवळाईत एका विहिरीत महिला पडली होती, तिलाही सुखरूप बाहेर काढले. दोन महिलांचे जीव वाचविले याचे मोठे समाधान आहे. अग्निशमन दलाकडे उपलब्ध प्रशिक्षित अधिकारीवर्ग नाही; तसेच साधनांची कमतरता आहे. त्यामुळे मोठ्या अडचणी बचावकार्यात येतात. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com