औरंगाबादच्या 'स्टर्लाइट'मध्ये वायूगळती 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 27 जुलै 2019

शेंद्रा पंचतारांकित औद्योगिक वसाहतीत असलेल्या स्टलाईट कंपनीमध्ये आज (ता. 27) दुपारी एकच्या सुमारास सिलीकॉन क्‍लोराईड या वायूची गळती झाली. या घटनेदरम्यान झालेल्या धावपळीत एक जण किरकोळ जखमी झाल्याची माहिती कंपनी प्रशासनाने दिली. 

औरंगाबाद - येथील शेंद्रा पंचतारांकित औद्योगिक वसाहतीत असलेल्या स्टलाईट कंपनीमध्ये आज (ता. 27) दुपारी एकच्या सुमारास सिलीकॉन क्‍लोराईड या वायूची गळती झाली. या घटनेदरम्यान झालेल्या धावपळीत एक जण किरकोळ जखमी झाल्याची माहिती कंपनी प्रशासनाने दिली. 

सिलीकॉन क्‍लोराईड (एसआयसीएल 4) हा वायू ऑप्टिकल फायबर तयार करण्यासाठी लागणारी सामग्री तयार करण्यासाठी आयात केला जातो. टॅंकरद्वारे आलेल्या या वायूला टॅंकरमध्ये रिकामा करताना ही गळती झाली. सबंध टॅंकर रिकामा झाल्यावर शिल्लक राहिलेला तुरळक वायू बाहेर काढण्यासाठीची प्रक्रिया सुरू असताना व्हॉल्व्हमधून गळती सुरू झाली. वातावरण दमट असल्याने हा वायू धुक्‍यासारखा परिसरात पसरला. त्या ठिकाणी काम करणारा कामगार धावपळीदरम्यान जखमी झाला. दक्षता म्हणून त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

या कंपनीच्या उभारणीचे काम दोन वर्षांपासून फास्ट्रॅकवर सुरू असून, आता उद्‌घाटनाच्या प्रतीक्षेत हा प्लांट आहे. ट्रायल रनसाठी आलेला वायू रिकामा करण्यासाठीची प्रक्रिया सुरू असताना ही घटना घडली. यामध्ये कंत्राटी कर्मचारी दिलीप काळे (वय 30) हा किरकोळ जखमी झाला आसल्याची माहिती स्टर्लाईट एचआर विभागाचे अधिकारी रोहित पाटील यांनी दिली. या दरम्यान त्याने सुरक्षेसाठी लागणारी सर्व उपकरणे घातली होती, असा दावा सुरक्षा विभागाचे प्रमुख अशोक गावडे यांनी पत्रकारांशी बोलताना केला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gas leakage in 'Starlight' company at Shandra