वृक्षारोपण मोहिमांत केवळ आरंभशूरपणा!

संकेत कुलकर्णी
शुक्रवार, 6 जुलै 2018

औरंगाबाद - आपल्याकडील जमिनीची आर्द्रताच नष्ट झाली आहे. त्यामुळे बोडक्‍या डोंगराळ भागातील रुक्ष व खडकाळ मातीत बिया रुजण्याची जैविक प्रक्रिया होऊ शकत नाही. बीजारोपण करण्यापूर्वी जमिनीचे परीक्षण होत नाही. सीड बॉम्बिंग केल्यानंतर चराईबंदी, वणव्यांपासून संरक्षण आणि देखभाल या बाबी रामभरोसे सोडल्या जातात. त्यामुळे वृक्षारोपणाची कोटीच्या कोटी उड्डाणे आरंभशूरपणाच ठरत असल्याचे मत जाणकार व्यक्त करत आहेत.

औरंगाबाद - आपल्याकडील जमिनीची आर्द्रताच नष्ट झाली आहे. त्यामुळे बोडक्‍या डोंगराळ भागातील रुक्ष व खडकाळ मातीत बिया रुजण्याची जैविक प्रक्रिया होऊ शकत नाही. बीजारोपण करण्यापूर्वी जमिनीचे परीक्षण होत नाही. सीड बॉम्बिंग केल्यानंतर चराईबंदी, वणव्यांपासून संरक्षण आणि देखभाल या बाबी रामभरोसे सोडल्या जातात. त्यामुळे वृक्षारोपणाची कोटीच्या कोटी उड्डाणे आरंभशूरपणाच ठरत असल्याचे मत जाणकार व्यक्त करत आहेत.

वृक्षारोपणाचे आकडे कितीही फुगवले, तरीही त्याच्या यशस्वितेचे गुणोत्तर शंभराला तीस मानले जाते. पर्यावरण तज्ज्ञांच्या मते, शेकडो हेक्‍टर जमिनीवर हेलिकॉप्टरद्वारे बीजफेक झाली, तरी त्या जमिनीची सच्छिद्रता उत्तम असेल तरच ते बीज रुजू शकणार आहे. त्यासाठी वन विभागाने काय पूर्वतयारी केली? आपल्याकडील बहुतांश जमिनीची आर्द्रता संपली आहे. त्यामुळे बियांची जीवशास्त्रीय प्रक्रियाच होत नाही. बीज जमिनीत पडणे, रुजणे, त्याला अंकुर फुटणे आणि मग त्याचे झाड होणे, ही प्रक्रिया सध्या वनांमध्ये थांबलेली आहे. या जैविकतेसाठी आवश्‍यक तपासणी, बीजारोपणापूर्वी खड्डे घेऊन जमिनीच्या आर्द्रतेची पाहणी, असे काहीही न करता सरळ डोंगरांवर ‘दे मार’ सीड बॉम्बिंग करून काहीही फायदा होत नाही.

चराईबंदी करणार कोण?
वन अभ्यासकांच्या मते, वनीकरण करण्यात आलेल्या पूर्ण क्षेत्रात येथून पुढे बेसुमार वृक्षतोड, अवैध चराईपासून प्रतिबंध करावा लागेल. त्या क्षेत्रातील मानवी हस्तक्षेप रोखावा लागेल. त्यासाठी वन विभागाची काही योजना आहे का? सध्या कशाचेच नियोजन नाही. फक्त आकडा फुगवणे, हेच एकमेव उद्दिष्ट असल्याचे उच्चपदस्थ वन अधिकाऱ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर बोलून दाखवले. शासकीय अथवा खासगी पैशाची उच्चाधिकाऱ्यांच्या मौजेखातर उधळपट्टी सुरू आहे. त्यामुळेच हा आरंभशूर लोकांचा प्रसिद्धीसाठी केलेला उद्योग वाटतो, असे परखड मत एका तज्ज्ञांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केले.

वनीकरणाचा यशस्वी प्रयत्न
वर्ष १९८६-८७ मध्ये माजी एअर चीफ मार्शल आय. एच. लतीफ महाराष्ट्राचे राज्यपाल असताना सातारा, कांचनवाडी डोंगरावर हेलिकॉप्टरद्वारे बीज पेरणी झाली होती; मात्र खडकाळ माळावर करण्यात आलेल्या या मोहिमेचे यश गुलदस्त्यातच राहिले. १९८९-९० मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी महाराष्ट्रात पाच ठिकाणी शहरी वनीकरणाचा विशेष उपक्रम राबवला. पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर या पाच शहरांमध्ये वनीकरण करण्यात आले. त्यात निपट निरंजन लेणीच्या डोंगराळ परिसरात वनीकरणाचे काम करण्यात आले. स्वतः शरद पवार तेथे आले होते.

शहराभोवतीच्या सर्व टेकड्यांवर उत्तम वनीकरण करण्यासाठी त्यांनी पाठपुरावा केला. पाच वर्षे ही मोहीम नियोजनपूर्वक राबवण्यात आली. त्या काळात सातारा, कांचनवाडी, देवळाली, सिंदोन, भिंदोन, चौका घाट आणि लेणीच्या डोंगरात काम झाले. ही सगळी कामे नीट नियोजनाने केली गेली. या पाच वर्षांत शहराभोवती सुमारे एक हजार हेक्‍टरवर वृक्षारोपण यशस्वी झाले, ते शेवटचेच. त्यानंतर तीस वर्षांनी आता फक्त एक इको बटालियनचा प्रयोग यशस्वी होताना दिसत आहे.

Web Title: Gautala Wild Life Sanctuary Tree Plantation