पर्यटकांना खुणावतेय गौताळ्याचे सौंदर्य 

संकेत कुलकर्णी
शुक्रवार, 27 सप्टेंबर 2019

मोठ्ठाल्या डोंगरदऱ्या आणि धुक्‍यात दडलेले जंगल पाहायला लोक इथून महाबळेश्वर, माथेरान आणि लोणावळ्याला जातात; पण आपल्या अगदी जवळ असलेल्या गौताळा अभयारण्यात बनलेला माहौल सध्या यापेक्षा कमी नाही.

औरंगाबाद : औरंगाबादपासून जेमतेम 70 किलोमीटरवर कन्नड, सोयगाव आणि चाळीसगाव तालुक्‍यांत 260 चौरस किलोमीटर परिसरात पसरलेल्या गौताळ्याचा परिसर जैवविविधतेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठिकाण आहे. देखण्या वनराजीतून खळाळणारे ओढे, धबधबा आदळणारे धारकुंड, सीताखोरी, केदारकुंड धबधबे आणि जागोजाग दिसणारे वन्य पशुपक्षी पाहण्यासाठी गौताळा अभयारण्यात पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. 

समृद्ध वनराजी 

अभयारण्यात साग, चंदन, खैर, सिरस, शिसे, धावडा, पिंपळ, पळस, करवंद, बोर, सीताफळ, अंजन असे विविध वृक्ष, घाणेरी, नागफण, कामोनी, पिठोरी, लखड, घायपातासारखी झुडपे, पवण्या, लव्हाळी, हरळी, कुसळी, नागरमोथा, शेळ्या हरळी आणि कित्येक सुगंधी गवत, सफेद मुसळी, शतावरी, अमरवेल, जंगली लवंग, गौळणा, हरणखुरी, हिरडा, बेहडा अशा औषधी वनस्पती या जंगलात पाहायला मिळतात. या ठिकाणी राहणारे आदिवासी या वनस्पती ओळखून त्यांचा औषधी म्हणून वापर करतात. रानकेळी, मनचंदी म्हाळू, गोमिळ्या, धोळ, म्हाकोडी, दौडी, तामूलकंद, खरबुरी, हामण, वढदावा, सुलेकंद या औषधी वनस्पती येथे आढळतात. 

पशू-पक्ष्यांचा पोषक अधिवास 

या जंगलात बिबटे, अस्वल, वानर, माकड, कोल्हे, भेकर, घोरपड, ससे, मुंगूस, रानमांजर, रानडुक्कर, तरस, सायाळ, असे विविध प्राणी, नाग, मण्यार, अजगर, घोणस, फुरसे, शेलाटी, रुखई असे साप इथे मुबलक आहेत. पक्षीमित्रांसाठी हे अभयारण्य म्हणजे पर्वणीच. स्वर्गीय नर्तक, हरियाल, तुर्रेबाज पाकोळी (क्रेस्टेड ट्री स्विफ्ट), मत्स्यघुबड (ब्राऊन फिश आऊल), सोनपाठी सुतार पक्षी, काळ्या खांद्याचे सुतार पक्षी असे कित्येक दुर्मिळ होत चाललेले पक्षीही येथे पाहायला मिळतात, अशी माहिती पक्षीमित्र डॉ. किशोर पाठक यांनी दिली. 

ऐतिहासिक किल्ला, मंदिरे, लेणी 

अंतूरचा किल्ला आणि जगप्रसिद्ध पितळखोरा लेणी हे या अभयारण्याचे भूषणच आहे. त्याचबरोबर पाटणादेवीचे मंदिर, तेथील प्राचीन यादवकालीन शिवमंदिर, गणिती भास्कराचार्य स्थान, सीताखोरी, डोंगरदरीत वसलेले काळदरी गाव, मुर्डेश्वर मंदिर, घाटनांद्रा येथील इंद्रगढी देवी संस्थान, जोगेश्वरी मंदिर, मनुबाई मंदिर, धारेश्वर मंदिर, पाणदेव, ही श्रद्धास्थानेही प्रेक्षणीय आहेत. 
गौताळा अभयारण्यातील टेकडीवरील एका गुहेत गौतम ऋषींचे स्थान व शिवलिंग आहे. टेकडीच्या पायथ्याशी सीता न्हाणी आहे. हिरव्यागार वेलींनी व घनदाट झाडांनी नटलेल्या या परिसरात ऋषिपंचमीला मोठी गर्दी होते. कुंडातील पाण्यात स्नान करून भाविक गौतम ऋषींचे दर्शन घेतात. पर्यटकांसाठी खास आकर्षण असलेले गौताळ्यातील केदारकुंड, पितळखोरा, धारकुंड, सीताखोरी असे धबधबे सध्या ओसंडून वाहत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gautala wildlife sanctuary attracting tourists