कुटुंबीयांच्या शोधासाठी पाकिस्तानातून आलेली गीता परभणीत दाखल

गणेश पांडे
Monday, 28 December 2020

गीता पंधरा वर्षांंपूर्वी चुकून पाकिस्तानात गेली होती. तत्कालीन परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्या पुढाकाराने कराचीहून ती 2015 साली भारतात परतली. पाकिस्तानात एधी फाउंडेशनने तिचा सांभाळ केला.

परभणी ः कुटूंबियांच्या शोधार्थ पाकिस्तानातून भारतात आलेल्या गिताचे सोमवारी (ता. 28) परभणीत आगमन झाले. तिने सांगितलेल्या खानाखुना या परभणी जिल्ह्यातील गंगाखेड व पूर्णा तालुक्यातील गावांशी जुळत असल्याने या दोन तालुक्यात तिच्या कुटूंबियांचा शोध घेतला जाणार आहे. या कामासाठी गिता तब्बल तीन महिणे जिल्हयात मुक्कामी राहणार आहे.

गीता पंधरा वर्षांंपूर्वी चुकून पाकिस्तानात गेली होती. तत्कालीन परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्या पुढाकाराने कराचीहून ती 2015 साली भारतात परतली. पाकिस्तानात एधी फाउंडेशनने तिचा सांभाळ केला. गीता भारतातून पाकिस्तानात गेली तेव्हा 7-8 वर्षांची होती व पंधरा वर्षांपूर्वी ती पाकिस्तानी रेंजर्सला सापडली होती. नंतर तिला एधी फाउंडेशनने दत्तक घेतले व नंतर ती कराचीत रहात होती. 2015  साली बिलकीस व त्यांचे नातू सबा व साद एधी तिच्यासमवेत भारतात आले होते.

पाकिस्तानातून भारतात पाच वर्षांपूर्वी परतलेल्या मूकबधिर गीताने कुटुंबीयांच्या शोधासाठी आता महाराष्ट्रात करण्याचा निर्णय घेतला आहे. गिताने सांगितलेल्या वर्णनावरून तिचे गाव शोधले जात आहे. तिच्या वर्णनानुसार रेल्वेमार्ग आणि गोदावरी काठावर तिचे गाव आहे. हा भाग परभणी जिल्ह्यातील पूर्णा व गंगाखेड तालुक्यात असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे गीता व तिच्या सोबत आलेले काही जन तीन महिणे परभणीत मुक्कामी राहणार आहेत. सोमवार ता.२८ डिसेंबर रोजी गीताचे परभणीत आगमन झाले. तिच्यासोबत इंदुरचे सांकेतिक भाषातज्ञ ज्ञानेंद्र पुरोहित हे आहेत. त्यांना महाराष्ट्र राज्य मूकबधिर मंडळाचे अध्यक्ष मनोज पटवारी, उपाध्यक्ष अनिकेत शेलगावकर आणि पहल फाउंडेशन तसेच रेल्वे प्रवासी सेनेचे संस्थापक संतोषकुमार सोमाणी हे सहकार्य करित आहेत.

हेही वाचा - नांदेड : अर्धांगवायू झालेली मानसिकता समाजाला गतिमान नेतृत्व देऊ शकत नाही- पी. बी. कोलंबीकर -

घराजवळ ऊस, तांदूळ व शेंगदाण्याचे पिक

गीताचा सांभाळ करणार्‍या इंदोर येथील आनंद सेवा सोसायटीच्या म्हणण्यानुसार, तिने तिच्या घराजवळ रेल्वे स्थानक असून परिसरात ऊस, तांदूळ आणि शेंगदाण्याचे पीक घेतले जात असल्याचे सांगितले आहे. त्या पार्श्वभूमीवर देशातील अशा दृश्यांची सर्व ठिकाणे गीताला दाखविण्यात येत आहेत. त्यानुसार परभणी शहरातील तसेच गंगाखेड आणि पूर्णा येथे रेल्वे स्थानकदेखील तिला दाखवून या गावांमध्ये तिला फिरवून तिच्या कुटुंबाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

 

संपादन- प्रल्हाद कांबळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Geeta from Pakistan arrives in Parbhani in search of family nanded news