रिकाम्या सभागृहात भरली सर्वसाधारण सभा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 5 ऑक्टोबर 2019

नगरसेवक, अधिकाऱ्यांची दांडी; महापौर संतप्त 

औरंगाबाद- महापालिकेच्या सर्वसाधारण सभेला शनिवारी (ता. पाच) अवघ्या दोन नगरसेवकांनी हजेरी लावली. अधिकाऱ्यांनीही दांडी मारल्यामुळे दोन वेळा सभा तहकूब केल्यानंतर महापौर नंदकुमार घोडेले यांचा पारा चांगलाच चढला. अतिरिक्त आयुक्तांना त्यांनी "ही महापालिका आहे की, धर्मशाळा?' असा प्रश्‍न केला. 

महापालिकेची शनिवारी सकाळी 11.30 वाजता सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती. मात्र विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्यामुळे काहीच कामकाज होणार नाही, हे माहीत असल्यामुळे पार्श्‍वभूमीवर नगरसेवकांसह अधिकाऱ्यांनी देखील पाठ फिरविली. गणपूर्ती अभावी महापौरांना दोनवेळा सभा तहकूब करावी लागली. तिसऱ्यांदा सभा सुरू झाली मात्र शिवसेनेचे नितीन साळवी व एमआयएम पक्षाचे गंगाधर ढगे हे दोन नगरसेवक हजर होते. निवडणूक कामामुळे अनेक अधिकारी देखील सभेला येऊ शकले नाहीत. त्यामुळे महापौरांचा पारा चांगलाच चढला. ही महापालिका आहे की? धर्मशाळा असा प्रश्‍न त्यांनी अतिरिक्त आयुक्त डी. पी. कुलकर्णी यांना केला. त्यानंतर सभा संपविण्यात आली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: General Meeting Empty House