सामान्य कार्यकर्ता ते आमदार; अंबादास दानवे यांचा प्रवास

माधव इतबारे
शुक्रवार, 23 ऑगस्ट 2019

आमदारकीची माळ अंबादास दानवे यांच्या गळ्यात पडली अन्‌ एक सामान्य कार्यकर्ता आमदार झाला, अशीच प्रतिक्रिया सर्वसामान्य कार्यकर्त्यांमध्ये उमटली.

औरंगाबाद - भाजपच्या मुशीत घडलेल्या अंबादास दानवे यांनी 1998 मध्ये शिवसेनेत प्रवेश करीत गेली 16 वर्षे जिल्ह्यातील संघटन मजबूत केले. मात्र, नगरसेवक व सभागृहनेता वगळता मोठे पद त्यांच्या वाट्याला आले नव्हते. अखेर बुधवारी (ता.22) स्थानिक स्वराज्यच्या निवडणुकीत आमदारकीची माळ अंबादास दानवे यांच्या गळ्यात पडली अन्‌ एक सामान्य कार्यकर्ता आमदार झाला, अशीच प्रतिक्रिया सर्वसामान्य कार्यकर्त्यांमध्ये उमटली. लोकसभा निवडणुकीत चंद्रकांत खैरे यांच्या निसटत्या पराभवानंतर खचलेल्या कार्यकर्त्यांमध्ये दानवेंच्या विजयामुळे उत्साह संचारला आहे. 

महाविद्यालयीन जीवनात हुशार विद्यार्थी म्हणून ओळख असलेल्या अंबादास दानवे यांनी सुरवातीला अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत काम केले. 1989-90 मध्ये ते भाजयुमोचे जिल्हा सचिव झाले. त्यानंतर महाराष्ट्र प्रदेश सचिवपदी त्यांची वर्णी लागली. 1995 पर्यंत या पदाची जबाबदारी सांभाळल्यानंतर 1995 मध्येच सिल्लोड विधानसभा मतदारसंघातील भाजपचे तत्कालीन उमेदवार किसनराव काळे यांचे प्रचारप्रमुख म्हणून त्यांनी उल्लेखनीय काम केले व काळे आमदार झाले. काही नेत्यांसोबत मतभेद झाल्यानंतर श्री. दानवे यांची भाजपमधून हकालपट्टी करण्यात आली. दिवाकर रावते यांच्या उपस्थितीत 1998 मध्ये दानवे यांनी सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर झालेल्या सभेत शिवसेनेत प्रवेश केला. दरम्यान, 2000 मध्ये ते अजबनगर वॉर्डातून नगरसेवक म्हणून निवडून आले. सभागृहनेतापदी निवड झाली, मात्र सर्वसाधारण सभेत पक्षविरोधी प्रश्‍न विचारल्यावरून त्यांच्या पदाचा राजीनामा घेण्यात आला व तेव्हापासून म्हणजेच 2004 पासून ते संघटना बांधणीचे काम करीत आहेत. 

2009 मध्ये त्यांनी गंगापूर विधानसभा मतदारसंघातून नशीब अजमावले; मात्र प्रशांत बंब यांनी त्यांचा 17 हजार 278 मतांनी पराभव केला. सुरवातीला प्रभारी जिल्हाप्रमुख व त्यानंतर 16 वर्षे जिल्हाप्रमुख म्हणून उल्लेखनीय काम करणारे दानवे थेट "मातोश्री'च्या संपर्कात होते. त्यामुळेच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी दानवे यांचे नाव अंतिम केल्याचे सांगितले जाते. थेट पक्षप्रमुखांच्या आदेशामुळे सर्वच शिवसेना नेत्यांनी व्यक्तिगत लक्ष घालत दानवे यांच्या विजयासाठी फिल्डिंग लावली. 
 
गुणवत्ता यादीत स्थान ते गोल्ड मेडल 
देवगिरी महाविद्यालयातून कला शाखेची पदवी घेतलेले अंबादास दानवे यांनी राज्याच्या मेरिट लिस्टमध्ये स्थान मिळविले होते. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून मास्टर ऑफ मास कम्युनिकेशनची पदवी घेतली. त्यात त्यांना गोल्ड मेडल मिळाले. याशिवाय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर त्यांनी पीएच.डी.देखील केलेली आहे.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: General worker to MLA