गेवराईत दरोडा; दां‍पत्याची हत्या

गेवराईत दरोडा; दां‍पत्याची हत्या

गेवराई - धारदार शस्त्रांसह कुऱ्हाडीचे घाव घालून दरोडेखोरांनी बॅंक अधिकाऱ्यासह त्याच्या पत्नीची हत्या केली. अशाच हल्ल्यात त्यांच्या दोन मुली गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यातील एक गर्भवती असून तिची प्रकृती चिंताजनक आहे. येथील गणेशनगरातील घरात बुधवारी (ता. २३) पहाटे तीनच्या सुमारास घडलेल्या या क्रूर, रक्तरंजित घटनेने शहर हादरले. दरोडेखोरांनी घरातील दागिन्यांसह रोख रक्कम मिळून लाखोंचा ऐवज लंपास केला. 

भवानी अर्बन को-ऑपरेटिव्ह बॅंकेच्या मुख्य शाखेतील प्रमुख वसुली अधिकारी तथा वरिष्ठ व्यवस्थापक आदिनाथ उत्तमराव घाडगे (वय ५०, मूळ गाव चकलांबा, ता. गेवराई) यांचे शहरातील गणेशनगरात गेल्या अनेक वर्षांपासून वास्तव्य आहे. पहाटे तीनच्या सुमारास त्यांच्या घराच्या दारावर थाप पडली. त्यामुळे दरवाजा उघडताच घाडगे यांच्या पत्नी अलका (४२) यांच्यावर दोन दरोडेखोरांनी धारदार शस्त्राने हल्ला चढवला. त्यानंतर आदिनाथ यांच्यावर कुऱ्हाडीने हल्ला केला. त्यात आदिनाथ व अलका घाडगे यांचा मृत्यू झाला. या दांपत्याची मुलगी वर्षा संदीप जाधव (२२) ही प्रसूतीसाठी घरी आली आहे. दरोडेखोरांनी तिच्यासह तिची बहीण स्वाती घाडगे (२१) यांनाही शस्त्राने मारहाण केली आहे. दोघींना सुरवातीला येथील उपजिल्हा, त्यानंतर बीड जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती चिंताजनक असल्याने वर्षा यांना औरंगाबाद येथील रुग्णालयात हलविण्यात आले. घाडगे यांचा मुलगा वैद्यकीय शिक्षणासाठी चाळीसगावला असतो. त्यामुळे तो या हल्ल्यातून बचावला. 

घरातील सदस्यांवर हल्ला केल्यानंतर दरोडेखोरांनी घरातील सोन्याचे दागिने, रोख रक्कम असा लाखोंचा ऐवज लुटला व पोबारा केला. 
पोलिसांनी प्राथमिक पंचनामा करून घाडगे पती-पत्नीचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. दरोडेखोरांच्या तपासासाठी जिल्ह्यात नाकाबंदी केली असून पाच पथके रवाना केली आहेत.

चोरटे दोनपेक्षा अधिक होते का, नेमका किती ऐवज लंपास केला याचा तपास केला जात आहे. पोलिस अधीक्षक जी. श्रीधर, अपर पोलिस अधीक्षक वैभव कलुबर्मे, ‘एलसीबी’चे निरीक्षक तेजनकर, गेवराईचे निरीक्षक सुरेश बुधवंत, तलवाडा पोलिस निरीक्षक बांगर आदींनी घटनास्थळाची पाहणी केली. स्वाती घाडगे यांच्या फिर्यादीवरून येथील पोलिस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल झाला आहे.

चकलांबा येथे अंत्यसंस्कार
गेवराई उपजिल्हा रुग्णालयात नागरिकांनी गर्दी केली. रुग्णालयाच्या परिसरात घाडगे यांच्या नातेवाइकांनी केलेला आक्रोश पाहून नागरिकांची मने हेलावली. घाडगे दांपत्यावर चकलांबा येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. 

ऐवजाची माहिती देणार कोण?
हल्ल्यात घरमालक आणि मालकीण जागीच मृत्युमुखी पडले, तर गंभीर जखमी दोन मुली रुग्णालयात आहेत. मुलगा शिक्षणानिमित्त बाहेरगावी असतो. त्यामुळे घरातून नेमका किती ऐवज लंपास झाला याची माहिती देणार कोण, हा पोलिसांसमोर सध्या प्रश्‍न आहे.

आधी सरस्वती कॉलनीत प्रयत्न
घाडगे यांच्या घराच्या दुसऱ्या मजल्यावर भाडेकरू असून दरोडेखोरांनी या घराला बाहेरून कडी लावली होती.
घाडगे यांच्या घरी जाण्यापूर्वी सरस्वती कॉलनीतील काशीबाई संतराम जोजारे यांच्या घरी दरोड्याचा प्रयत्न.
तपासासाठी नाकाबंदी, पाच पोलिस पथके रवाना.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com