खोट्या कागदपत्रांद्वारे ही टोळी असा मिळवित होते जामीन 

मनोज साखरे
गुरुवार, 7 नोव्हेंबर 2019

जामीन मिळवुन देण्यासाठी कुणाचाही ऑनलाईन सातबारा सेतु सुविधा केंद्रातुन काढला जात होता. सातबाऱ्यावरील नाव तसेच टोळीतील व्यक्तीचा अथवा इतर कुणाचाही फोटो वापरुन कलर प्रिंटरद्वारे बनावट आधारकार्ड तयार करायचे. त्यानंतर बनावट ऐपत प्रमाणपत्र (सॉलव्हन्सी) तयार करुन टोळीतील व्यक्तीच सातबाराधारक असल्याचे भासवुन जामीन मिळवुन देत होते. 

औरंगाबाद - गुन्ह्याच्या स्वरुपानुसार पाच ते पन्नास हजारांचा रेट ठरवायचा. त्यानंतर जामीनासाठी बनावट कागदपत्रे तयार करायची व संशयित आरोपींचे जामीन मिळवायचे. अशी मोडस वापरुन राज्यात ठिकठिकाणी जामीन घेणाऱ्या टोळीला औरंगाबाद गुन्हेशाखा पोलिसांनी गुरुवारी (ता. सात) बेड्या ठोकल्या. या टोळीत काही महिलांचाही समावेश असुन विशेषत: त्याही जामीन घेत होत्या. 
 
पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, शेख मुश्‍ताक शेख मुनाफ (वय 36, रा. रशिदपुरा, हिनानगर), पुनम दिगंबर सावजी उर्फ गणोरकर (वय 62, रा. हडको एन-12), वसीम अहेमद खान शमीम अहेमद खान (वय 46, रा. नालासोपारा, जि. पालघर), अयुबखान रमजान खान (वय 52, रा. बायजीपुरा), शेख जावेद शेख गणी (वय 20, रा. अंबरहील कॉलनी), लालचंद बद्रीलाल अग्रवाल (वय 51, रा. लेबर कॉलनी), टिपलेश अनिल अग्रवाल (वय 23, रा. लेबर कॉलनी), रोशनबी शेख सलीम (वय 48, रा. चेलीपुरा, काचीवाडा), नसीम बेगम शकील खान (वय 49, रा. सईदा कॉलनी, जटवाडा), खातुनबी शेख हसन (वय 50, रा. पंढरपुर, तिरंगा कॉलनी), पायल नाना दांडगे उर्फ फातेमा जावेद शेख (वय 19, उरा. अंबरहील) अशी संशयितांची नावे आहेत. 

या संशयितांना वेगवेगळी कामे नेमुन दिलेली होती. टोळीतील काही एजंट म्हणुन न्यायालयाच्या आवारात फिरुन जामीनाची गरज असलेल्यांच्या नातेवाईकांना भेटायचे. जामीन मिळवुन देण्याच्या बदल्यात गुन्ह्याचे स्वरुप पाहुन पाच ते पन्नास हजारांपर्यंत रक्कम उकळायची. त्यानंतर बनावट कागदपत्रे तयार करुन जामीनासाठी अर्ज करायचा व जामीन मिळवुन द्यायचा. अशी मोडस ही टोळी वापरत होती. या संशयितांना अटक करण्यात आली आहे. अशी माहिती पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी दिली. 

असे चालायचे काम 
जामीन मिळवुन देण्यासाठी कुणाचाही ऑनलाईन सातबारा सेतु सुविधा केंद्रातुन काढला जात होता. सातबाऱ्यावरील नाव तसेच टोळीतील व्यक्तीचा अथवा इतर कुणाचाही फोटो वापरुन कलर प्रिंटरद्वारे बनावट आधारकार्ड तयार करायचे. त्यानंतर बनावट ऐपत प्रमाणपत्र (सॉलव्हन्सी) तयार करुन टोळीतील व्यक्तीच सातबाराधारक असल्याचे भासवुन जामीन मिळवुन देत होते. 

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: getting such bail through false documents