घाटातली वाट, धोके सतराशे साठ!

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 29 जुलै 2018

औरंगाबाद - पोलादपुरात कठडे नसल्याने दरीत कोसळलेल्या बसमधील तीस जणांना प्राण गमवावे लागले. शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या दौलताबाद घाटात अपघाताचे ‘आमंत्रक’ असेच दबा धरून बसले आहेत! शासकीय कारभाऱ्यांच्या बेफिकिरीमुळे येथूनही वाहने कोसळण्याचा धोका कायम आहे. 

औरंगाबाद - पोलादपुरात कठडे नसल्याने दरीत कोसळलेल्या बसमधील तीस जणांना प्राण गमवावे लागले. शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या दौलताबाद घाटात अपघाताचे ‘आमंत्रक’ असेच दबा धरून बसले आहेत! शासकीय कारभाऱ्यांच्या बेफिकिरीमुळे येथूनही वाहने कोसळण्याचा धोका कायम आहे. 

पोलादपूर भागात कोसळलेल्या बसमध्ये तब्बल तीस प्रवासी जिवानिशी गेले. आठशे फूट खोल दरीत गेलेल्या या बसमधील प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी मोठी दमछाक सुरू होती. एवढी खोल दरी नसली तरी ज्या कारणाने या बसचा अपघात झाला ती कारणे औरंगाबाद शहरालगतच्या घाटात जिवंत असल्याने शासकीय अधिकाऱ्यांची बेफिकिरी पुन्हा समोर आली आहे. औरंगाबाद-कन्नड- चाळीसगाव-धुळे रस्त्यामध्ये असलेल्या दौलताबाद घाटाचा रस्ता बऱ्या स्थितीत असला तरी या रस्त्यालगत संरक्षक कठडे अनेक ठिकाणी गायब आहेत. याविषयी सार्वजनिक बांधकाम विभाग (राष्ट्रीय महामार्ग), ‘एनएचएआय’च्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

अस्तित्वातील कठडे अडीच फुटांचे
दौलताबाद-वेरूळ रस्त्यावरील घाटाच्या वाटेवर अंदाजे पाचशे मीटर भागात चार ठिकाणी कठडे गायब आहेत. ज्या ठिकाणी कठडे आहेत त्यांची उंची अवघी अडीच फूट असल्याने त्यावरून वाहने आदळून घाटाखाली जाण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. या रस्त्याची डांबरीकरणाने उंची वाढली, तर कठड्यांची कमी झाली.

गेल्या वर्षी औट्रम घाटात कोसळला रस्ता
औट्रम घाट हा निम्म्या मराठवाड्याला उर्वरित भारत आणि गुजरातशी जोडणारा दुवा आहे. या घाटात गेल्या वर्षी रस्ता खचला होता आणि कठड्याचे काम पक्के नसल्याने येथे असलेली जलनिस्सारण यंत्रणा गायब झाली होती. यानंतर राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने हा रस्ता बंद करीत वाहतूक अन्यत्र वळविली होती. आता चाळीसगाव घाटात कोणताही धोकादायक रस्ता नसल्याचा ‘एनएचएआय’चा दावा आहे.

कोकणसारख्या दऱ्या औरंगाबादेत नसल्या तरी अपघात सांगून होत नाहीत. दौलताबाद घाटातील कठडे खुजे तर अनेक ठिकाणी तुटलेले आहेत. त्यांची उंची वाढवण्याची गरज आहे. दौलताबाद किल्ल्याला वळसा घालून जाणारा बायपासही लवकर व्हावा. 
- विवेक सराफ, निरीक्षक, दौलताबाद ठाणे

Web Title: ghat danger accident