घाटीतील निम्मी यंत्रे जातील वर्षभरात भंगारात, रुग्णांची होणार फरपट

योगेश पायघन
मंगळवार, 3 डिसेंबर 2019

जिल्हा वार्षिक योजना 2017-18 मध्ये घाटी रुग्णालयासाठी मंजूर 1.54 कोटी, 2018-19 मध्ये 2.51 कोटी आणि सात कोटी तर 2019-20 मध्ये 10 कोटींची मंजुरी मिळाली होती. डीपीसीतून 40 प्रकारच्या यंत्रांसाठी आवश्‍यक 8.61 कोटींच्या यंत्रसामग्रीला तांत्रिक मान्यता मिळूनही दोन महिने उलटले; मात्र अनुदान गेल्या महिन्याभरापासून जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्रतीक्षित आहे.

औरंगाबाद : घाटी रुग्णालयातील ट्रॉमा केअर युनिटमध्ये दहापैकी नऊ व्हेंटिलेटर बंद असल्याची परिस्थिती "सकाळ'ने समोर आणली. त्याचबरोबर घाटीतील सध्या सुरू असलेली व्हेंटिलेटर, महत्त्वाच्या यंत्रांपैकी निम्मी यंत्रे ही वर्षभरात कालबाह्य होत भंगारात जातील.

पर्यायी व्यवस्था गरजेची असल्याने प्रशासनाने गेल्या तीन वर्षांपासून पाठपुरावा केला. त्यामुळे यंत्रखरेदीला मान्यता अन्‌ निधीही मिळाला; मात्र लालफितीचा अडसर आल्याने 22 कोटींची यंत्रखरेदी हाफकिन महामंडळाकडे अडकली. त्यात घाटी रुग्णालयात अतिगंभीर रुग्णांची गुंतागुंतीच्या उपचारासाठी फरपट होत असल्याचे चित्र आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाला पीजी अपग्रेडेशन, राज्य योजना, जिल्हा वार्षिक योजनेतून यंत्रसामग्रीसाठी निधी उपलब्ध होतो. 2017-18, 18-19, 19-20 या तीन आर्थिक वर्षांत निधी मिळाला. तो केंद्रीय खरेदीसाठी हाफकिन महामंडळाकडे वर्गही झाला.

जमीन खरेदी करण्यापूर्वी हे नक्की वाचा

यामध्ये साधारण 100 प्रकारची अतिमहत्त्वाची यंत्रसामग्रीचा 30 कोटींच्या यंत्रांचा समावेश आहे. त्यापैकी केवळ 2017-18 या वर्षांतील साडेआठ कोटींची यंत्रसामग्री घाटीला मिळाली. त्या वर्षासह अजून पुढच्या दोन वर्षांचा निधी हाफकिनकडे गेल्या वर्षापासून पडून आहे. अशी एकूण सुमारे 22 कोटींची यंत्रखरेदीच रखडलेली आहे.

डीपीसीचे 8.61 कोटी अडकले

जिल्हा वार्षिक योजना 2017-18 मध्ये घाटी रुग्णालयासाठी मंजूर 1.54 कोटी, 2018-19 मध्ये 2.51 कोटी आणि सात कोटी तर 2019-20 मध्ये 10 कोटींची मंजुरी मिळाली होती. डीपीसीतून 40 प्रकारच्या यंत्रांसाठी आवश्‍यक 8.61 कोटींच्या यंत्रसामग्रीला तांत्रिक मान्यता मिळूनही दोन महिने उलटले; मात्र अनुदान गेल्या महिन्याभरापासून जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्रतीक्षित आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला 2017-18 मधील पीजी अपग्रेडेशनच्या 68.36 लाखांच्या यंत्रांपैकी 64 लाखांची यंत्रे मिळाली तर 22 लाख राज्य योजनेतील 47 लाख तर 18-19 मधीलही राज्य योजनेच्या 74.18 लाख रुपयांची यंत्रे तर शिर्डी संस्थानकडून मिळालेल्या 15.90 कोटींच्या थ्री टेसला एमआरआय यंत्राचीही हाफकिन महामंडळाकडून मिळण्याची प्रतीक्षा आहे. 

कोण म्हणाले - हिंदू तरुणांवरील गुन्हे मागे घ्या 

अतिदक्षता विभाग दुर्लक्षित

घाटीत एमआयसीयू, आयसीसीयू, टीआयसीयू, पीआयसीयू, एनआयसीयू हे मराठवाड्यातील दर्जेदार अन्‌ गुंतागुंतीच्या उपचारांसाठी प्रसिद्ध आहेत. शेजारील 16 हून अधिक जिल्ह्यांतून मरणाच्या दारातील रुग्णांवर दोन महिने - तीन महिने उपचार करून चालतेबोलते करून पाठवल्याची अनेक उदाहरणे आहेत. विभागीय टर्शरी केअरचे तेच विभाग सध्या दुर्लक्षित होत असल्याने सर्वसामान्य रुग्णांचा आधार हिरावला जात असल्याने आर्थिक भुर्दंडाला सामोरे जाण्याची वेळ आली आहे. 

26 व्हेंटिलेटरची खरेदी रखडली

गेल्या तीन वर्षांतील विविध निधीतून 26 विविध प्रकारच्या व्हेंटिलेटरची मागणी, मान्यता, निधी मिळून हाफकिनकडे खरेदी रखडल्याचे समोर आले आहे. तर मेडिसीन विभागातील 32 पैकी सोळा व्हेंटिलेटर पुढच्या वर्षभरात कालबाह्य होतील. अनेक व्हेंटिलेटर नादुरुस्त आहेत. त्यांच्या देखभाल दुरुस्तीच्या निधीअभावी दुरुस्त्या रखडल्याचे चित्र आहे. त्यासाठीही आताच तातडीने तरतूद गरजेची आहे. तसेच हिवाळी अधिवेशनातील घाटीच्या पुरवणी मागणीसाठीही लोकप्रतिनिधींनी आवाज उठवण्याची गरज आहे. 

जिल्हा रुग्णालयाचेही बोट हाफकिनकडेच

चिकलठाण्यातील जिल्हा सामान्य रुग्णालयाचे हस्तांतरण होऊन दोन वर्षे सरली. हळूहळू 14 विभाग सुरू झाले. त्यालाही चांगला प्रतिसाद मिळाला. गेल्या दीड वर्षात 2 लाख 30 हजार ओपीडी, वर्षभरात 6,000 आयपीडी, 1,300 प्रसूती तर 150 सिझेरियन, 250 मोठ्या, 750 छोट्या शस्त्रक्रिया इथे झाल्या; मात्र ब्लड बॅंक आणि अत्यावश्‍यक यंत्रसामग्री हाफकिनकडून न मिळाल्याने पूर्ण क्षमतेने हे रुग्णालय सुरू होऊ शकले नाही. 

Image result for kanan yelikar
डॉ. कानन येळीकर

हाफकिनकडे निधी वर्ग केलेला आहे. यंत्रसामग्री लवकर मिळण्याकरिता पाठपुरावा करण्यासाठी नोडल ऑफिसर नेमलेले आहेत. प्रशासनाकडून पाठपुरावा सुरू आहे. 
- डॉ. कानन येळीकर, अधिष्ठाता, घाटी रुग्णालय, औरंगाबाद. 

आकडे बोलतात... 
वर्ष----बाह्यरुग्ण उपचार---आंतररुग्ण उपचार 
2016----6,56,168----80,798 
2017----7,12,287----88,628 
2018----6,51,333-----98,216 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ghati Aurangabad Requires Equepment of Rs. 22 Crore