औरंगाबाद - मागील काही महिन्यांपासून घाटी रुग्णालय विविध समस्यांच्या गर्तेत सापडले आहे. त्यामुळे प्रशासनास रुग्णांवर उपचार करण्यासोबतच येणाऱ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांनी एक महिना पुरेल एवढी औषधी उपलब्ध करून देत घाटी प्रशासनाची बोळवण केली. प्रश्न मार्गी लावण्यासाठी लवकरच उच्चस्तरीय बैठक घेण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी सांगितले.
घाटी रुग्णालयाच्या विविध समस्या मार्गी लावण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी दुपारी बारा वाजता बैठक झाली. या वेळी आमदार संजय शिरसाट, आमदार इम्तियाज जलील, आमदार अतुल सावे, घाटीच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर आदी उपस्थित होते. संबंधितांनी औषधांचा तुटवडा, बंद पडलेली साम्रगी यांसह अनेक अडचणी मांडल्या. त्यावर जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी सामान्य रुग्णालयासह महापालिकेच्या रुग्णालयाने घाटीला औषधींसह अन्य मदत उपलब्ध करून देण्याचा आदेश दिला; तसेच सार्वजनिक बांधकाम विभागालाही बांधकाम दुरुस्तीसह अन्य कामे तातडीने मार्गी लावण्यात यावीत, अशा सूचना केल्या.
|