घाटीत होणार आदर्श शवविच्छेदनगृह

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 मे 2018

औरंगाबाद - शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात (घाटी) सध्याच्या मॉर्च्युरीच्या जागेवर आदर्श शवविच्छेदन व चिकित्सागृह उभारण्याचा निर्णय झाला आहे. चार कोटी ८८ लाख ४६ हजार रुपयांच्या अंदाजपत्रकाला ता. २९ जानेवारीला मान्यता मिळाली होती. त्यानंतर बजेटमधून वर्ष २०१८-१९ साठी १ कोटी ६१ लाखांचा निधी मंजूर असून, येत्या तीन महिन्यांत बांधकामाला सुरवात होण्याची शक्‍यता आहे. 

सहयोग ट्रस्टने वर्ष २०११ मध्ये उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात महाराष्ट्रातील शवविच्छेदनगृहांच्या संदर्भात याचिका दाखल केली होती. त्याबाबत उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार न्यायवैद्यक व विषशास्त्र विभागाच्या (एफएमटी) अंतर्गत येणाऱ्या घाटीतील शवविच्छेदनगृहाच्या अत्याधुनिकीकरणासंदर्भात गोवा राज्याच्या धर्तीवर सार्वजनिक बांधकाम विभागाने जुलै २०१७ मध्ये प्रस्ताव सादर केला होता. त्याच्या अंदाजपत्रकास मान्यता मिळाली. चार महिन्यांनंतर जागा निश्‍चिती झाली. यासंदर्भात अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी सोमवारी (ता. सात) नव्या शवविच्छेदनगृहासाठी जागा निश्‍चित केली. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाला लेखी कळवण्यात आल्याचे सहायक अभियंता के. एम. आय. सय्यद यांनी सांगितले. यासाठी लातूर व मिरज येथे आदर्श शवविच्छेदनगृहाचे नकाशे मागवण्यात आले आहेत. लवकरच अंदाजपत्रक व निविदा प्रक्रिया राबविण्यात येईल. येत्या दोन आर्थिक वर्षांत निधीचा खंड न पडल्यास प्रत्यक्ष बांधकाम सुरू झाल्यावर तेथून पुढे १८ महिन्यांच्या कालावधीत या दुमजली इमारतीचे बांधकाम पूर्ण होण्याची शक्‍यता असल्याचेही ते म्हणाले.

ऑटोप्सी ऑडिटोरियम, म्युझियम, नातेवाइकांसाठी वेटिंग रूम व डॉक्‍टरांच्या कॉन्फरन्स रूमसह दोन मजली इमारतीत अत्याधुनिक आदर्श शवविच्छेदन व शीतगृह असणार आहे. सध्या सुरू असलेले शवविच्छेदनाचे काम सुरळीत ठेवून या इमारतीचे बांधकाम करण्यात येणार आहे. 
- डॉ. के. यू. झिने, प्रभारी वैद्यकीय अधीक्षक व एफएमटी विभागप्रमुख, घाटी.

Web Title: ghati hospital modern Autopsy house