तूप, लोणी घेणारा ग्राहक गायब 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 नोव्हेंबर 2016

औरंगाबाद - बाजारातून तूप आणि लोणी खरेदी करणारा ग्राहक पाचशे आणि एक हजाराच्या नोटा बंद झाल्यापासून गायबच झाला आहे. त्यामुळे पदार्थ तयार करण्यासाठी केली जाणारी दूध खरेदीही आता निम्म्याने घटली आहे. त्यामुळे दुधाचा धंदा करणाऱ्यांवरही याचा परिणाम झाला आहे. 

औरंगाबाद - बाजारातून तूप आणि लोणी खरेदी करणारा ग्राहक पाचशे आणि एक हजाराच्या नोटा बंद झाल्यापासून गायबच झाला आहे. त्यामुळे पदार्थ तयार करण्यासाठी केली जाणारी दूध खरेदीही आता निम्म्याने घटली आहे. त्यामुळे दुधाचा धंदा करणाऱ्यांवरही याचा परिणाम झाला आहे. 

शहरात पिशवीचे दूध येत असले तरी लहान डेअरींमधून दूध आणि दुग्धजन्य पदार्थ घेणाऱ्यांची संख्या यात मोठी आहे. दूध ही खराब होणारी गोष्ट असल्याने त्याचा साठा करता येत नाही. त्यातून तयार करण्यात आलेले पदार्थ उदा. दही, पनीर हे पदार्थ फार काळ टिकाव धरत नसल्याने त्यांच्या खरेदीचे पैसे हे नुकसानीचे ठरतात. हजार आणि पाचशे रुपयांच्या नोटा बंद झाल्याने दुधाचा पदार्थ असलेले तूप आणि लोणी खरेदी करणारे ग्राहक बाजारात येणे बंद झाले आहे. त्यामुळे दुधाचे पदार्थ तयार करणाऱ्या डेअरी व्यावसायिकांनी आता दूध खरेदीच घटवली आहे. बहुतांश व्यवहार हा नगदी असल्याने जमेल तसे पैसे सध्या डेअरी चालक दुग्ध व्यावसायिकांना देताहेत. 

हाती येतील तसे पैसे देणे सुरू 
सध्या दुग्धजन्य पदार्थांचा व्यापार करणाऱ्यांच्या दिवसाकाठी हाती येणारी रक्‍कम ही निम्म्यावर आली आहे. हा धंदा रोखीवर चालणारा असल्याने अचानक नोटाबंदी झाल्याने हा धंदा करणाऱ्यांचा धंदा एकदमच ठप्प झाला होता. आताही परिस्थिती फारशी बदललेली नाही. हाती येईल ती रक्कम दूध आणून टाकणाऱ्यांच्या हातात सध्या डेअरीवाले टेकवत असल्याचे चित्र पाहायला मिळते आहे. 

सध्याच्या परिस्थितीत लोकांनी तूप आणि लोण्यासारखे दुग्धजन्य पदार्थ विकत घेणे थांबवले आहे. दुधाची खरेदी निम्म्यावर आल्याने पदार्थ तयार करणेही घटले आहे. दोन हजारांची नोट आल्याने फायदा तसा काहीच झाला नाही. पैसेच नसल्याने दूध आणणाऱ्यांना देण्यासाठी सध्या पैसे नाहीत. उसनवारीवर काम सुरू आहे. बाजार सुधारेल या अपेक्षेने वाट पाहत आहोत. 
- मनोज भोमा, आनंद डेअरी, गुलमंडी 

एक हजार आणि पाचशे रुपयांच्या नोटा बंद झाल्याने एकाएकी धंदा बसला होता पण बाजारात सुट्टे पैसे यायला लागले, त्यामुळे धंद्यात जरा सुधार व्हायला लागला आहे. पैसे येत असल्याने दूध आणून टाकणाऱ्यांना पैसा देणे आता शक्‍य होत आहे. 
- एकनाथ कडवत्रे, लोकसेवा डेअरी, भाजीमंडई 

Web Title: Ghee, butter customer disappeared