
लातूर जिल्ह्यातील जळकोट तालुक्यातील घोणसी मंडळातील २७ गावावर अतिवृष्टी झाली आहे. हाती आलेले उत्पन्न पावसाने उद्धवस्त केले असून शेतकर्यांच्या आशा आकांक्षावर पाणी फिरले आहे, त्यामुळे महसुल प्रशासनाच्या वतीने नुकसानीचे पंचनामे सुरु करण्यात आले आहे.
जळकोट (लातूर) : तालुक्यातील घोणसी महसूल मंडळामध्ये झालेल्या अतिवृष्टीने सोयाबीनसह खरीप पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. उपविभागीय अधिकारी प्रवीण मेगशेट्टी यांच्यासह अधिकार्यांनी पाहणी करत बुधवारी (ता.२३) पंचनामे करण्याचे आदेश दिले. त्यानुसार सर्वेक्षण व पंचनामे सुरु झाले आहेत.
मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!
घोणसी महसूल मंडळातील गुत्ती, तिरुका, अतनूर ,डोंगरगाव , बोरगाव , खंबाळवाडी , चिंचोळी, धोंडेवाडी , मेवापूर , शिवाजीनगर तांडा , आदी गावात सलग दोन दिवसातील मध्यरात्रीच्या सुमारास वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडून रस्ते, नाले, कालवे तडुंब भरले होते. पूरामुळे शेतातील पिकांचे प्रचंड नुकसान केले आहे. तातडीने तहसिलदार संदीप कुलकर्णी, तालुका कृषी अधिकारी आकाश पवार यांनी भेट देऊन पाहणी केली. दुबार पेरणीच्या संकटातून शेतकरी कसाबसा सावरलेल्या अवस्थेत असताना या पावसाने नुकसान पुन्हा आशा आकांशावर पाणी फेरले आहे. हाती आलेल्या सोयाबीन पिकाची प्रचंड प्रमाणात नासाडी झाली आहे.
औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
या पावसानंतर बुधवारी (ता.२३) उदगीरचे उपविभागीय अधिकारी प्रवीण मेगशेट्टी, तहसीलदार संदीप कुलकर्णी, कृषी अधिकारी आकाश पवार, गटविकास अधिकारी चंद्रहार ढोकणे, मंडळ अधिकारी तथा तलाठी विश्वास धुप्पे तसेच संबंधीत गावचे तलाठी, ग्रामसेवक व शेतकरी यांनी तात्काळ नुकसान झालेल्या या महसूल मंडळातील गावांना भेटी देऊन नुकसानीची पहाणी केली. सर्व ठिकाणचे नुकसानीचे पंचनामे केले आहेत. कालपासून सर्वेक्षण व पंचनामे सुरु असल्याची माहिती तहसीलदार श्री. कुलकर्णी यांनी दै. सकाळशी बोलताना दिली.
देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
घोणसी मंडळात १२२ मिलीमीटर पाऊस झाल्याने सोयाबीनचे मोठे नुकसान झाले. सोयाबीनला कोंब फुटले आहेत. उपविभागीय अधिकारी प्रवीण मेगशेट्टी यांनी पाहणी करुन पंचनाम्याचे आदेश दिले. तर ४ हजार ५०० हेक्टरचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. ग्रामसेवक, तलाठी व कृषी सहाय्यक यांचे पथक दोन दिवसापासून प्रत्यक्ष सर्वेक्षण पंचनामे करत आहेत. येत्या सोमवारी (ता.२८) अहवाल द्यायचा आहे. - आकाश पवार, तालुका कृषी अधिकारी.
(संपादन-प्रताप अवचार)