हसनाबादच्या गिरिजा नदीत नुसते डबके

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 सप्टेंबर 2019

हसनाबाद परिसरात केवळ रिमझिमच झाली. त्यामुळे पिके उगवली; पण नदी-नाले कोरडेच राहिले आहेत. विशेष म्हणजे हसनाबादच्या गिरिजा नदीत केवळ डबके दिसत आहे.

हसनाबाद - भोकरदन तालुक्‍यातील काही भागांसह जिल्ह्यात ठिकठिकाणी पावसाने हजेरी लावली. हसनाबाद परिसरात केवळ रिमझिमच झाली. त्यामुळे पिके उगवली; पण नदी-नाले कोरडेच राहिले आहेत. विशेष म्हणजे हसनाबादच्या गिरिजा नदीत केवळ डबके दिसत आहे. 

भोकरदन तालुक्‍यातील काही भागांत पावसाने जोरदार हजेरी लावली. मात्र, हसनाबाद परिसरात सुरवातीपासून केवळ रिमझिमच पाऊस झाला. या पावसामुळे पिकांची तहान भागविली गेली, नदी-नाले मात्र कोरडेच राहिले. दुष्काळामुळे हसनाबाद परिसरातील ग्रामस्थ त्रस्त झालेले आहेत. त्यामुळे किमान यंदा जोरदार पाऊस पडेल अशी अपेक्षा होती. तरीही पावसाळ्याच्या प्रारंभापासून केवळ शिडकाव्यापुरताच पाऊस पडत आहे. परिणामी भूजल पातळीतही फारशी भर पडलेली नाही. परिसरातील विहिरी, कूपनलिकांच्या पाणीपातळीत नगण्य वाढ झालेली आहे. या भागातील तलावातही जेमतेम पाणी साचलेले आहे. विशेष म्हणजे परिसरातील गिरिजा नदीपात्राची अवस्था पडीक जमिनीसारखी झाली आहे. काठी ठिकाणी केवळ पाण्याचे डबके दिसत आहेत. त्यामुळे नदीचे अस्तित्वही हरवून गेलेले आहे. परिसरात जोरदार पाऊस न पडल्यास हिवाळ्यापासूनच पाणीप्रश्‍न उद्‌भवण्याची शक्‍यता आहे. 

जिल्ह्यात सरासरी 9.29 मिलिमीटर पाऊस 
जालना : जिल्ह्यात शनिवारी (ता.21 ) सकाळपर्यंतच्या मागील 24 तासांत सरासरी 9.29 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. यात जालना तालुक्‍यात 3 मिलिमीटर, तर आतापर्यंत 383.44 मिलिमीटर, बदनापूर तालुक्‍यात 9.80 मिलिमीटर, तर आतापर्यंत 414.20, भोकरदन तालुक्‍यात 8.75 मिलिमीटर तर आतापर्यंत 647.29, जाफराबाद तालुक्‍यात 4 मिलिमीटर, तर आतापर्यंत 505.60, परतूर तालुक्‍यात 16.68 मिलिमीटर, तर आतापर्यंत 442.53, मंठा तालुक्‍यात 2.50 मिलिमीटर, तर आतापर्यंत 386.50, अंबड तालुक्‍यात 11 मिलिमीटर, तर आतापर्यंत 502.02, घनसावंगी तालुक्‍यात 18.57 मिलिमीटर, तर आतापर्यंत 469.76 मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. जिल्ह्याची वार्षिक सरासरी 688.21 मिलिमीटर एवढी असून 1 जूनपासून शनिवारी सकाळपर्यंत जिल्ह्यात सरासरी 468.92 मिलिमीटर एवढा पाऊस झाला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Girija river dry