घरात एकटी पाहून सहावीतील मुलीवर अत्याचार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 जून 2019

घरात एकटी असलेल्या दहावर्षीय मुलीचे तोंड दाबून तिला गच्चीवर नेत अत्याचार केला. हा गंभीर प्रकार चार जूनला सायंकाळी सिडको एन-सात, त्रिवेणीनगर येथे घडला. याप्रकरणी सिडको पोलिसांनी तरुणाच्या मुसक्‍या आवळून अटक केली.

औरंगाबाद - घरात एकटी असलेल्या दहावर्षीय मुलीचे तोंड दाबून तिला गच्चीवर नेत अत्याचार केला. हा गंभीर प्रकार चार जूनला सायंकाळी सिडको एन-सात, त्रिवेणीनगर येथे घडला. याप्रकरणी सिडको पोलिसांनी तरुणाच्या मुसक्‍या आवळून अटक केली.

पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, विशाल मिलिंद पारधे (वय २८, रा. सिडको) असे संशयिताचे नाव आहे. इयत्ता सहावीत शिक्षण घेणारी दहावर्षीय मुलगी आजीकडे राहते. मंगळवारी मुलीची आजी घाटी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या नातेवाइकाला भेटण्यासाठी गेली.

त्यावेळी मुलगी घरी एकटीच होती. ही संधी साधून विशाल पारधे याने घरात घुसून मुलीचे तोंड दाबून गच्चीवर नेले. तेथे पीडितेवर त्याने अत्याचार केला. पीडितेने विरोध केल्याने विशालने धमकावले. यादरम्यान रुग्णालयातून आजी घरी आली. मुलगी घरात नसल्याने आजीने तिचा शोध घेतला असता मुलगी गच्चीवर रडताना दिसली. आजीने तिला जवळ घेत विश्‍वासाने विचारपूस केली. त्यावेळी तिच्यासोबत झालेल्या प्रकाराबाबत आजीला सांगितले. याप्रकरणी सिडको पोलिसात मुलीच्या नातेवाइकांनी दिलेल्या तक्रारीनुसार, संशयिताविरुद्ध बाललैंगिक अत्याचार अधिनियमनुसार (पोक्‍सो) गुन्ह्याची नोंद करण्यात आली. यानंतर सिडको ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक विश्‍वनाथ झुंजारे यांच्या पथकाने रात्रीतून विशालला ताब्यात घेत, त्याची कसून चौकशी केली. त्यानंतर अटक केली.

दहा जूनपर्यंत कोठडी
संशयिताला बुधवारी (ता. पाच) दुपारी न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी संशयिताची वैद्यकीय तपासणी करायची आहे, गुन्ह्यात सहकारी आहे का, याचा तपास करायचा असल्याने संशयिताला पोलिस कोठडी देण्याची विनंती पोलिसांनी न्यायालयाकडे केली. ही विनंती मान्य करून न्यायालयाने संययिताला १० जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Girl Atrocity Crime