"त्या' मुलीची आत्महत्या ब्लॅकमेलिंगला कंटाळून 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 28 मे 2019

फेसबुक, व्हॉटस्‌ऍपवर व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत असल्याने ब्लॅकमेलिंगला कंटाळून दहावीतील मुलीने आत्महत्या केली, अशी तक्रार मुलीच्या वडिलांनी दिली.

औरंगाबाद - फेसबुक, व्हॉटस्‌ऍपवर व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत असल्याने ब्लॅकमेलिंगला कंटाळून दहावीतील मुलीने आत्महत्या केली, अशी तक्रार मुलीच्या वडिलांनी दिली. त्यानुसार या प्रकरणी दोघांविरुद्ध सोमवारी (ता. 27) पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली. 24 मे रोजी पहाटे मुलीने आत्महत्या केली होती. 

पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, मूळ सेलू तालुक्‍यातील पूनम अर्जुन वाघाळे (वय 15) हिने औरंगाबादेतील भारतनगर येथे काकाच्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. या प्रकरणात तिचे वडील अर्जुन सोनाजी वाघाळे (रा. रोहेगाव, ता. सेलू, जि. परभणी) यांनी तक्रार दिली. त्यानुसार अक्षय आश्रुबा साळवे (रा. रोहेगाव, ता. सेलू) व सोनू शिवाजी रगडे (रा. झरी, ता. जिंतूर) अशी संशयितांची नावे आहेत. त्यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली गुन्ह्याची नोंद करण्यात आली. पूनमने इयत्ता दहावीची परीक्षा दिली होती. तिला अक्षय साळवे हा नेहमी त्रास देत होता. तसेच, मावसभाऊ सोनू रगडे वेळोवेळी गावात येऊन अक्षयची मदत करीत होता. या त्रासाला कंटाळल्याने तिचे वडील अर्जुन वाघाळे यांनी त्यांचे औरंगाबादेतील भाऊ राजेश वाघाळे (रा. भारतनगर, मुकुंदवाडी) यांच्याकडे तिला राहण्यासाठी पाठवले होते. 23 मे रोजी रात्री नऊच्या सुमारास अर्जुन वाघाळे यांनी सोनूला त्यांच्या घरी बोलावून पूनमला त्रास देत असल्याबाबत विचारपूस केली. त्यावेळी त्याने अक्षयबाबत आपणास माहिती नाही, असे म्हणत उडवाउडवीची उत्तरे दिली. यानंतर अर्जुन वाघाळे यांनी भाऊ राजेश यांच्या मोबाईलवर संपर्क साधून पूनमकडे अक्षयबाबत विचारणा केली. तेव्हा, पूनमने अक्षय नेहमी त्रास देतो व त्याला सोनू मदत करीत असल्याचे सांगितले. यावर सोनूने मोबाईल घेऊन काही एक सांगू नको, अन्यथा आपल्या तिघांचे फोटो, व्हिडिओ फेसबुक व व्हॉटस्‌ऍपवर टाकून तुझी बदनामी करीन असे धमकावत फोन कट केला व सोनू तेथून निघून गेला. यानंतर 24 मे रोजी पहाटे पूनमने गळफास घेतला. दोघांच्या ब्लॅकमेलिंगमुळे मुलीने आत्महत्या केल्याचे अर्जुन वाघाळे यांनी तक्रारीत नमूद केले. त्यानुसार या प्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्यात आली. 

सोमवारी वाघाळे यांनी पुंडलिकनगर पोलिस ठाणे गाठत अक्षय साळवे आणि सोनू रगडेविरुद्ध तक्रार दिली. प्रकरणाचा पुढील तपास उपनिरीक्षक कापसे करीत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Girl committed suicide due to Blackmailing