कारने उडवले अन्‌ ट्रकने चिरडले

वैभवी खिरड
वैभवी खिरड

औरंगाबाद - महाविद्यालयात जाताना मागून आलेल्या भरधाव कारने धडक दिल्याने दुचाकीस्वार मुलगी कोसळली. त्याचवेळी समोरून आलेल्या ट्रकच्या चाकाखाली चिरडून ती जागीच ठार झाली. ही विदारक घटना बुधवारी (ता. २४) सकाळी नऊच्या सुमारास उस्मानपुरा भागातील भाजीवाली बाई पुतळ्याजवळ घडली. मृत विद्यार्थिनी शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात शिक्षण घेत होती. 

पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, वैभवी सुनील खिरड (वय १६, व्यंकटेश कॉलनी) असे तिचे नाव आहे. वैभवी शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात प्रथम वर्षात शिक्षण घेत होती. महाविद्यालयात जायचे असल्याने ती मोपेड दुचाकीने जात होती. चाणक्‍यपुरी येथून निघून दर्गा चौक पार केल्यानंतर ती उस्मानपुरा येथील भाजीवाली बाई पुतळ्याच्या दिशेने महाविद्यालयात जात होती. त्यावेळी मागून आलेली कार चौकात तिच्या दुचाकीला धडकली.

यामुळे ती खाली कोसळली. दरम्यान, समोरून आलेल्या ट्रकच्या चाकाखाली ती चिरडली गेली. मोठा रक्तस्राव झाल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर दोन्ही वाहने पसार झाली. घटनास्थळी नागरिकांनी धाव घेत घटनेची पोलिसांना माहिती दिली व वैभवीला घाटीत दाखल केले.

अपघातप्रकरणी उस्मानपुरा पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली. खिरड परिवारात वैभवी एकुलती एक मुलगी होती. मनमिळाऊ वैभवीच्या अपघाती मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. 

स्वप्न भंगले... 
वैभवी अत्यंत हुशार होती. तिला अभियांत्रिकी शाखेची आवड होती. ती शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात शिक्षण घेत होती. अकाली मृत्यूमुळे तिचे अभियंता होण्याचे स्वप्न अपूर्णच राहिले. 

सीसीटीव्हीद्वारे शोध सुरू 
भाजीवाली बाई पुतळ्याजवळील रस्त्यावर सकाळी तुरळक वर्दळ असते. अपघातावेळी घटनास्थळी कुणीही नव्हते. त्यामुळे कोणत्या वाहनाची धडक बसली ही बाब स्पष्ट नसून पोलिस परिसरातील सीसीटीव्हीच्या आधारे अनोळखी वाहनाचा शोध घेत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com