...आणि मुलगीच निघाली पॉझिटिव्ह, मुंबईच्या जावयाचा बोरगावकरांना धक्का

विकास गाढवे
बुधवार, 20 मे 2020

विनारवानगी गावात आलेल्या मुंबईच्या जावयाने बोरगावच्या (काळे, ता.लातूर) ग्रामस्थांना मंगळवारी (ता.१९) चांगलाच धक्का दिला. पत्नी व मुलाला घेऊन सासरवाडीत दाखल झालेल्या जावयालाच सुरवातीपासून कोरोनाची लक्षणे दिसून येत होती. मात्र, तपासणीनंतर जावयाचा अहवाल निगेटिव्ह अन् माहेरवाशीण मुलीचा अहवाल पॉझिटिव्ह आला.

लातूर  : विनारवानगी गावात आलेल्या मुंबईच्या जावयाने बोरगावच्या (काळे, ता.लातूर) ग्रामस्थांना मंगळवारी (ता.१९) चांगलाच धक्का दिला. पत्नी व मुलाला घेऊन सासरवाडीत दाखल झालेल्या जावयालाच सुरवातीपासून कोरोनाची लक्षणे दिसून येत होती. मात्र, तपासणीनंतर जावयाचा अहवाल निगेटिव्ह अन् माहेरवाशीण मुलीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. मंगळवारी रात्री आलेल्या अहवालाने बोरगावकरांसह प्रशासनालाही धक्का बसला. जावई व मुलीच्या सरबराईत गावात हिंडलेल्या सासुबाई आता क्वारंटाईनमध्ये असून आरोग्य यंत्रणेने बुधवारी (ता.२०) नातवाचाही स्वॅब घेतला आहे.

रात्रभर कारने प्रवास करून रविवारी (ता.१७) सकाळी मुली व नातवासह जावई सासरवाडीत आले. त्यांच्या भोजनाची व्यवस्था करण्यासाठी सासुबाई गावात काही ठिकाणी जाऊन भाजापाला व अन्य साहित्य घेऊन आल्या. याची माहिती उपसरपंच डॉ. कैलास काळे यांना मिळताच त्यांनी सर्वांना जिल्हा परिषद शाळेत बोलावून घेतले. जावयाला ताप व श्वास घेण्यास त्रास असल्याची लक्षणे दिसून येताच डॉ. काळे यांनी तातडीने याची माहिती निवळीच्या प्राथमिक आरोग्य केंद्राला दिली. केंद्राच्या डॉक्टरांनी जावई व मुलीला मुरूडच्या ग्रामीण रूग्णालयात पाठवले.

उदगीरमधील त्या खासगी डॉक्टर अन् कर्मचाऱ्यांचे अहवाल निगेटिव्ह

सोमवारी हे दाम्पत्य लातूरला एका खासगी रूग्णालयात गेले. लक्षणे दिसून येत असल्याने खासगी रूग्णालयाने विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत पाठवले. तिथे दोघांचे स्वॅब घेण्यात आल्याची माहिती गावात कळाली. प्रशासनालाही याची माहिती होती. यामुळे जावयाचा अहवाल पॉझिटिव्ह येईल, असेच सर्वांना वाटत होते. मंगळवारी (ता.१९) सर्वांनाच दिवसभर त्याची उत्सुकता होती. उत्सुकता शिगेला पोचली असतानाच काहीच लक्षणे नसलेल्या मुलीचा अहवाल पॉझिटिव्ह व जावयाचा अहवाल निगेटिव्ह आला व सर्वांनाच धक्का बसला. थोड्या वेळासाठी दोघांच्या स्वॅबमध्येच बदल झाल्याची चर्चा घडून आली. या कुटुंबांचा जास्त संपर्क लोकांशी संपर्क आला नसल्याचेही डॉ.काळे यांनी सांगितले.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Girl Found Corona Positive, Fear Among Borgaon Villagers Latur