गारखेडा परिसरातून मुलीचे अपहरण! 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 जानेवारी 2017

औरंगाबाद -  मामाला लॉटरी लागल्याची थाप मारून सह्या करण्याच्या बहाण्याने गारखेडा परिसरातून मुलीचे अपहरण करण्यात आल्याची घटना शनिवारी (ता.14) दुपारी तीनच्या सुमारास घडली. एका शेतात नेऊन तिच्यावर अतिप्रसंगाचा प्रयत्न झाला. मात्र मुलीने प्रसंगावधान राखत स्वतःची सुटका करवून घेतली. 

औरंगाबाद -  मामाला लॉटरी लागल्याची थाप मारून सह्या करण्याच्या बहाण्याने गारखेडा परिसरातून मुलीचे अपहरण करण्यात आल्याची घटना शनिवारी (ता.14) दुपारी तीनच्या सुमारास घडली. एका शेतात नेऊन तिच्यावर अतिप्रसंगाचा प्रयत्न झाला. मात्र मुलीने प्रसंगावधान राखत स्वतःची सुटका करवून घेतली. 

अठरा वर्षीय अनुष्का (नाव बदलले आहे.) गारखेडा भागात आई व बहिणीसह मामाकडे राहते. शनिवारी दुपारी तीनला ती आईसोबत त्रिमूर्ती चौकातील एका फोटोफ्रेमच्या दुकानात आली होती. यावेळी तीस ते पस्तीस वर्षीय तरुण तिथे आला. मामाला लॉटरी लागल्याचे त्याने अनुष्काला सांगितले. घर दाखवा, मामीची सही घ्यायची, असे सांगितल्याने अनुष्का व तिच्या आईने त्याच्यावर विश्‍वास ठेवला. घर दाखविण्यासाठी त्याच्यासोबत आईने अनुष्काला पाठवले. दुचाकीवर बसवून तो तिला घरी घेऊन गेला. अनुष्काने तिच्या मामाचे घर दाखविल्यानंतर तो तिथेच थांबला. घरात अनुष्काचे आजोबा व मामाशी बोलणे झाल्यानंतर त्याने पुन्हा लॉटरी लागलेल्या "आयफॉय' ऑफिसमध्ये अनुष्काला नेण्याचा बहाणा केला. त्यानंतर तिला ऑफिसऐवजी सिडको बसस्थानक परिसरात तिला नेले. तिथून शहरापासून सुमारे तीस किलोमीटर अंतरावर असलेल्या आडूळ (ता. पैठण) येथील एका शेतात नेले. तिथे सायंकाळी पाचच्या सुमारास एका झोपडीत तिच्यावर अतिप्रसंगाचा प्रयत्न केला, मात्र प्रसंगावधान राखत तिने कशीबशी सुटका करवून घेतली. 

शेतकऱ्याच्या मोबाईलवरून साधला संपर्क 

अनुष्काने विरोध केल्याने तिच्या तोंडात त्याने बोळा कोंबला. त्यानंतर गळा दाबून ठार मारण्याची धमकी दिली. तिने झटापट करून अपहरणकर्त्याच्या तावडीतून सुटका करवून घेतली व शेतातून पळ काढला. एका शेतकऱ्याच्या मोबाईलवरून तिने बहिणीशी संपर्क साधला व आपबिती सांगितली. त्यानंतर नातेवाइकांनी धाव घेऊन तिला पोलिस ठाण्यात आणले. 

आरोपीची दुचाकी सीसीटीव्हीत कैद 
अनुष्काच्या तक्रारीनुसार, तरुणाविरुद्ध जवाहरनगर ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली. मुलीला पळवून शहरातून दुचाकीने नेत असतानाचा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला. पल्सर गाडी असून (एम.ए. 20, 5743) मुलीने दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी दुचाकी गेलेल्या मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज गोळा केले आहे. संशयिताचा शोध सुरू आहे. 

Web Title: girl kidnapped case