अल्पवयीन मुलीच्या अपहरणानंतर संशयितांना पोलिसांकडून अभय

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 मे 2017

चार दिवस उलटल्यावर वैद्यकीय चाचणी
आरोपींना वाचविण्याचे जोरदार प्रयत्न

चार दिवस उलटल्यावर वैद्यकीय चाचणी
आरोपींना वाचविण्याचे जोरदार प्रयत्न

औरंगाबाद - मित्राच्या सांगण्यावरून एका अल्पवयीन मुलीचे अपहरण केले. तिला मुंबईला नेऊन परत आणले. त्यानंतर संशयिताला ठाण्यात हजर केले. पण, लगेचच सोडून दिले. दरम्यान, पोलिसांनी मुलीची वैद्यकीय चाचणी तब्बल चार दिवस लांबविली. त्यानंतरही संशयितांना अटक झाली नसून, त्यांना अभय देण्याचाच प्रकार संबंधित पोलिस करीत असल्याचा आरोप पीडित मुलीच्या नातेवाइकांनी केला आहे.

एका विवाहित तरुणाने चौदा वर्षीय मुलीला लग्न करण्याचे आमिष दाखवले. त्यानंतर तिला मुंबईला नेण्याची जबाबदारी त्याने त्याच्या एका रिक्षाचालक मित्रावर सोपविली. त्याने मुलीला मुंबईला न्यावे आपण मागून येऊ, असे त्याने सांगितले. आठ मे रोजी रिक्षाचालकाने आईवडिलांच्या ताब्यातून मुलीला पळवून नेले. शिवाय तिने घरातून सोन्याचे दागिने घ्यावेत, अशा सूचनाही आरोपीने केल्या. दरम्यान, शहागंज येथील एका ज्वेलर्सच्या दुकानात त्या दागिन्यांची आठ हजारांत विक्री केली. यानंतर मुलीला मुंबईला नेण्यात आले. मुलगी बेपत्ता झाल्याने तिचे कुटुंबीय हवालदिल झाले. त्यांनी एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. मुलगी बेपत्ता झाल्याबाबत अपहरणाच्या गुन्ह्याची नोंदही झाली.

दरम्यान, मुलीच्या पालकांनी काही मोबाईल क्रमांक दिल्यावरून तिला पळवणाऱ्याची माहिती पोलिसांना मिळाली. याचा मागमूस लागल्याने 11 मे रोजी संशयित रिक्षाचालकाने मुलीला औरंगाबादेत आणले. तत्पूर्वी त्याला पोलिस ठाण्यात बोलावण्यात आले. थातुरमातुर चौकशीनंतर त्याला सोडून देण्यात आले. यानंतर मुलीला त्याने प्रोझोन मॉल येथे सोडून दिले. मुलीने प्राथमिक जबाब दिला. नंतर मात्र तिची वैद्यकीय चाचणी पोलिसांनी केलीच नाही. संशयितांना अभय मिळत असल्याने मुलीचे नातेवाईक व अन्य नागरिकांनी पोलिस उपायुक्तांची भेट घेतली.

उपायुक्तांनी निर्देश दिल्यानंतर मुलीची चार दिवसांनंतर सोमवारी (ता. 15) रात्री वैद्यकीय चाचणीची प्रक्रिया पार पडली. तिने डॉक्‍टरांकडे जवाब दिला. विशेषत: मुलीचा पूर्ण जवाब पोलिसांनी घेतला नसून, संशयितांवरही अद्याप कारवाई झाली नाही. मुलीला बालगृहात ठेवण्यात आले आहे.

मुलीने "सकाळ'ला सांगितलेली आपबिती
प्रश्‍न : तरुण काय आमिष दाखवत होता ?
मुलगी : "पत्नीला तलाक देऊन तुझ्याशी लग्न करतो, मुलं इतरांकडे सांभाळायला ठेवतो,' असे सांगून त्याने गोड बोलून शरीरसंबंध प्रस्थापित केले.

प्रश्‍न : अत्याचार कधी केले?
मुलगी : पत्नी माहेरी गेल्यानंतर घरी बोलावून अत्याचार केले. त्यानंतर अनेकदा असा प्रकार घडला.

प्रश्‍न : त्यापुढे काय प्रकार घडला?
मूलगी : तो म्हणाला, 'आपण पळून जाऊन लग्न करू, पैसे घेऊन व साहित्य घेऊन ये.''

प्रश्‍न : आठ तारखेला काय झाले?
मुलगी : नारेगावात पंधरा मिनिटे थांबण्याचे सांगितले. त्यानंतर रिक्षाचालक मित्रासोबत येण्यास सांगितले. त्याच रिक्षावाल्याने मला मुंबईला नेले. पण, गैरप्रकार केला नाही. परंतु, मला आमिष दाखवणाऱ्याने यापूर्वी अत्याचार केला आहे.

प्रश्‍न : अकरा तारखेनंतर काय झाले?
मुलगी : प्रोझोन मॉलजवळ त्या रिक्षावाल्याने सोडले. त्यानंतर माझा पोलिस ठाण्यात जवाब झाला. लग्नाचे आमिष दाखवून मला तरुणाने चुकीचा जवाब द्यायला भाग पाडले.

वैद्यकीय चाचणी झाली का?
मुलगी : सोमवारी (ता. 15) वैद्यकीय चाचणी झाली. डॉक्‍टरांना खरा प्रकार जवाबाद्वारे सांगितला.

Web Title: girl kidnapping in aurangabad