मित्र रागावल्याने तरुणीची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 2 एप्रिल 2019

आत्महत्येनंतर मैत्रीण आली घरात?
सूत्रांनी माहिती दिली की, पूजाच्या आत्महत्येनंतर तिची एक मैत्रीण पूजाच्या घरात आली. ती दहा मिनिटे घरात होती. तिने मोबाईलमधील मेसेज, चॅटिंग डिलीट केले असावेत, असा संशय असल्याने मुकुंदवाडी पोलिसांनी तिला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

औरंगाबाद - एकमेकांच्या ओळखीनंतर संभाषण वाढून मैत्रीही झाली. त्यातून तिने एका मित्राच्या वाढदिवसाला त्याला बोलावले; पण तिथे त्यांच्यात वाद झाला अन्‌ नंतर तिने घरी येत स्वत:चे जीवन संपविले. ही घटना मुकुंदवाडीतील अंबिकानगर येथे रविवारी (ता. ३१) सायंकाळी उघडकीस आली. यात संशयित तरुणाला पोलिसांनी अटक केली. 

पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, पूजा मच्छिंद्र गायकवाड (वय १८, रा. गल्ली क्र. सात, अंबिकानगर, मुकुंदवाडी) असे मृताचे नाव आहे. स्वप्नील डिब्बे (वय २४, रा. गल्ली क्र. आठ, अंबिकानगर, मुकुंदवाडी) असे अटकेतील संशयित तरुणाचे नाव आहे. तो एका खासगी बॅंकेत विक्री अधिकारी आहे. पूजाने सिल्लोड तालुक्‍यातील हट्टी येथे बारावीची परीक्षा दिली होती. त्यानंतर ती घरीच होती. रविवारी शुभम वाघ नामक मित्राचा वाढदिवस असल्याने पूजा तिच्या मैत्रिणी व मित्रासोबत कॅनॉट प्लेस येथे गेली. तेथे तिने स्वप्नीललाही बोलावले; परंतु तेथे दोघांत वाद झाला. वाढदिवस साजरा झाल्यानंतर ती घरी आली. त्यावेळी स्प्रिंग बनविण्याचे काम करणारी तिची आई व मजुरी करणारा भाऊ कामावर गेले होते. तिचे वडील बलसाड (गुजरात) येथे कामासाठी गेले होते. तसेच तिची बहीणही बाहेर गेल्याने पूजा घरी एकटीच होती. अस्वस्थता वाढल्यानंतर तिने स्वप्नीलने आपणास टाळल्याची व शिवीगाळ केल्याची बाब फोन करून मैत्रिणीला सांगितली. संभाषण संपल्यानंतर तिने घरात पंख्याला दोरीच्या साह्याने गळफास लावून आत्महत्या केली. कामावरून सायंकाळी पाचच्या सुमारास तिची आई घरी परल्यानंतर ही बाब लक्षात आली.

दरम्यान, पूजाच्या आत्महत्येनंतर तिचे वडील मच्छिंद्र गायकवाड यांना बोलावण्यात आले. सोमवारी (ता. एक) सकाळी वडील आले. घडलेल्या प्रकारानंतर त्यांच्यावर आभाळच कोसळले. घटनेनंतर त्यांनी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. याप्रकरणी पोलिसांनी संशयित स्वप्नील डिब्बेविरुद्ध गुन्ह्याची नोंद केली, अशी माहिती उपनिरीक्षक मीरा चव्हाण यांनी दिली.

Web Title: Girl Suicide Crime