माझ्या पप्पाचा पगार वाढवा ना, चिमुकलीचे मुख्यमंत्र्यांना पत्र

बाबासाहेब गोंटे 
Saturday, 14 December 2019

बापाची वेदना जाणत पहिलीतल्या चिमुरडीनं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं खरं; पण सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या पत्राला आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय उत्तर देतात, याचीच प्रतीक्षा असणार आहे. 

अंबड (जि. जालना) : एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा पगार आधीच कमी, पेन्शनही तुटपुंजी. त्यामुळे घरखर्चाचा मेळ घालताना त्यांची तारेवरची कसरत होते. सरकारला या गोष्टी माहीत आहेत, परिवहन मंत्र्यांनाही हे सगळं कळत असावं, पण आता अगदी कर्मचाऱ्यांच्या घरातल्या चिमुकल्यांनाही याची झळ बसू लागल्यावर एका चिमुरडीने याला वाचा फोडली आहे. 

जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्‍यातील या चिमुकलीने आपल्या बाबांना शाळेत सोडायला येण्याची गळ घातली. तेव्हा तिच्या बाबांनी तिला जे सांगितलं, त्यावरून तिनं बिचारीनं बापाची वेदना जाणली आणि आपल्या परीनं त्यावर उपायही शोधला. या चिमुकलीनं थेट मुख्यमंत्र्यांनाच पत्र लिहिलं. त्यात माझ्या पप्पांचा पगार वाढवा, म्हणजे ते ओव्हटाईम करणार नाहीत आणि मला शाळेत सोडायला येऊ शकतील, अशी गळच घातली. हे पत्र सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनले आहे. 

कोण आहे ही मुलगी?

श्रेया सचिन हराळे असं या चिमुरडीचं नाव आहे. अंबडच्या मत्स्योदरी इंग्लिश स्कूलमध्ये पहिलीच्या वर्गात शिकते. 'सकाळ'नं तिच्या वडिलांशी संपर्क साधला असता, त्यांनी यामागची कहाणी सांगितली. तिला घरातल्या कुणीही याबद्दल काही म्हटलं नाही. पण तिनं स्वतःच हे पत्र लिहिलं. त्यात ती म्हणते, 

Jalna Ambad News

आदरणीय मुख्यमंत्रीजी, 
माझे नाव श्रेया सचिन हराळे आहे. 
मी मत्स्योदरी स्कूल, अंबड येथे 1ल्या वर्गात शिकते. पत्रास कारण की, माझे पप्पा खूप दिवसांपासून अंबडच्या बसमध्ये कंडक्‍टरचे काम करतात. माझे पप्पा सकाळी लवकर जातात आणि उशिरा येतात. 
मी त्यांना विचारले तर ते मला म्हणतात, ""सोनू बेटा ओव्हर टाईम करावा लागतो. माझा पगार कमी आहे.'' 
म्हणून आदरणीय मुख्यमंत्रीजी माझी विनंती आहे तुम्हाला, माझ्या पप्पाचा पगार वाढवा ना, मग माझे पप्पा मला शाळेत सोडवायला येतील आणि ओव्हर टायम करणार नाही. 
माझे पप्पा खूप चांगले आहेत. 

From,

Shreya Sachin Harale,

Matsyodari English School,

Ambad. Pin - 431204

कुटुंबप्रमुखावर किती ताण? 

अंबड तालुक्‍यातील ढाकलगावचे रहिवासी असलेले सचिन हराळे 2011 ला एसटीत कंडक्‍टर म्हणून लागले. आठ वर्षांनंतर आता पगार झालाय 17 हजार. राहायला घर नाही, म्हणून त्यांनी हिंमत करून घर बांधण्यासाठी साडे चार लाखांचं कर्ज काढलं होतं. त्याचा महिना 13 हजार रुपये हफ्ता भरावा लागतो. पगारातले उरतात फक्त साडे तीन हजार. त्यांना पहिलीतली श्रेया आणि साडे तीन वर्षांची श्रुती या दोन मुली. घरखर्च, किराणा, मुलांचं शिक्षण, गणवेश, कपडे, खाणपिणं यासाठी पैसे उरतात तरी कुठे? 

Image result for s t conductor salary

म्हणून करतात ओव्हरटाईम 

घरची परिस्थिती जेमतेम. साडे तीन हजारांत काय काय करणार? म्हणून ते रात्रीबेरात्रीही ओव्हरटाईम करतात आणि गाडीवर जातात. त्यामुळे पगारात थोडीफार तरी वाढ होते. या खर्चातून घर चालवतो. मुलगी रोज विचारते, "पप्पा रोज उशिरा का येतात?'' तिची समजूत काढताना तिला हे सांगितलं, तर तिनं थेट मुख्यमंत्र्यांच्या नावे पत्रच लिहिलं, असं सचिन हराळे सांगत होते. 

मुख्यमंत्री काय उत्तर देणार? 

बापाची वेदना जाणत पहिलीतल्या चिमुरडीनं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं खरं; पण सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या पत्राला आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय उत्तर देतात, याचीच प्रतीक्षा हराळे कुटुंबाबरोबरच हे पत्र वाचलेल्या नागरिकांनाही असणार आहे. 

हेही वाचा - आणि पंकजा मुंडे यांनी हाती घेतला पोलिसांचा दंडुका


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Girl Wrote Letter to Chief Minister To Give Salary Hike To His Father