अधीक्षक घरात, वसतिगृह वाऱ्यावर!

मधुकर कांबळे
गुरुवार, 27 डिसेंबर 2018

औरंगाबाद - शहरी भागातील मुलींच्या वसतिगृहात कडेकोट सुरक्षा व्यवस्था असतानादेखील पालकांमध्ये गेल्या काही दिवसांतील घटनांमुळे चिंता व्यक्‍त केली जात आहे. यापेक्षाही गंभीर चित्र समाजकल्याण विभागामार्फत चालविण्यात येणाऱ्या मुलींच्या वसतिगृहातील असल्याचे समोर आले आहे. एवढेच काय, मराठवाड्यातील अनेक वसतिगृहांमध्ये रात्रीच्या वेळी अधीक्षकसुद्धा राहत नाहीत. यामुळे हलाखीच्या परिस्थितीतून जिद्दीने शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या खेड्यापाड्यांतील मुलींच्या सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे.

शहरातील वसतिगृहात आकांक्षा देशमुख या मुलीचा काही दिवसांपूर्वी खून झाल्याने खळबळ उडाली आहे. खासगी महाविद्यालयाच्या वसतिगृहांमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने विशेष काळजी घेतली जाते. मात्र, ही सुरक्षा भेदून आकांक्षाचा खून करण्यात आला. या घटनेच्या पार्श्‍वभूमीवर समाजकल्याण विभागातर्फे चालविल्या जाणाऱ्या वसतिगृहांचा गतवर्षी करण्यात आलेला अभ्यास अहवाल "सकाळ'च्या हाती लागला आहे.

त्यात अभ्यास समितीने अनेक धक्कादायक निरीक्षणे नोंदविली आहेत. मराठवाडा वैधानिक विकास मंडळातर्फे समाजकल्याण विभागांतर्गत मराठवाड्यातील मुलींच्या वसतिगृहांची सद्यःस्थिती काय आहे? याविषयीचा अभ्यास करण्यासाठी किनवटचे डॉ. अशोक बेलखोडे यांच्या अध्यक्षतेखाली तज्ज्ञ अभ्यासगटाची स्थापना करण्यात आली होती.

अंबाजोगाईच्या प्रा. डॉ. अरुंधती पाटील या समितीच्या कार्याध्यक्ष आहेत. या अभ्यास गटाने दिलेल्या अहवालात अनेक वसतिगृहांमध्ये रात्रीच्या वेळी अधीक्षकच हजर राहत नसल्याने संपूर्ण "सुरक्षा'च वाऱ्यावर सोडल्याचे चित्र असते. अनेक मुलींनी आपबिती कथन केली, त्याची नोंद अहवालात करण्यात आली आहे.

Web Title: Girls Hostel Security Issue