मोदींना आणखी पाच वर्षे संधी द्या; माजी पंतप्रधानांच्या कन्येचे मत

give modi five more years says former prime ministers daughter
give modi five more years says former prime ministers daughter

लातूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आणखी पाच वर्षे द्यायला हवीत. त्यांचे व्हिजन चांगले आहे. ते पूर्ण करण्यासाठी त्यांना आपण आणखी एक टर्म द्यायला हवी, असे मत दिवंगत पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांच्या कन्या सुरभी वाणी देवी यांनी रविवारी व्यक्त केले.

एका कार्यक्रमानिमित्ताने वाणी देवी लातूरात आल्या होत्या. यावेळी ‘सकाळ’ने त्यांच्याशी संवाद साधला. ‘पंतप्रधान म्हणून वडिलांनंतर आवडणारी व्यक्ती’ अशा शब्दांत वाणी देवी यांनी पाच वर्षांपूर्वी मोदींचे कौतूक केले होते. स्वच्छता अभियानाबद्दल जाहीरपणे भरभरून बोलत अशा योजनांमुळे वडिलांची पावलोपावली आठवण होते, असेही त्या म्हणाल्या होत्या. याबद्दल वाणी देवी यांना प्रश्न विचारला असता त्यांनी 'मोदी हे व्हीजन असलेले नेते आहेत. त्यांना आपण आणखी काम करण्याची संधी द्यायला हवी', असे त्या म्हणाल्या.

पंतप्रधान पदापर्यंत पोचणे अत्यंत कठीण असते. देशात करोडो लोक आहेत; पण एकच व्यक्ती या पदापर्यंत पोचते. यामागे त्यांचे कष्ट, त्यांची दूरदृष्टी, कामाची पद्धत अशा अनेक गोष्टी कारणीभूत ठरत असतात. देशाच्या हितासाठी एक व्हीजन ठेऊन मोदी पंतप्रधान झाले आहेत. त्यांची कामे अजून पूर्ण झाली नाहीत. ती अपूर्ण राहता कामा नयेत. त्यामुळे आणखी पाच वर्षाची संधी आपण त्यांना द्यायला हवी. तरच त्यांनी ठरवलेले व्हीजन पूर्ण होईल. नवीन माणूस पंतप्रधान म्हणून आला तर आधीच्या पंतप्रधानांनी पाहिलेले व्हीजन, त्यांची कामे अर्धवटच राहतात, असे त्यांनी आवर्जून नमूद केले. 

वडिलांनंतर पंतप्रधान पदाची जबाबदारी अटलबिहारी वाजपेयी यांच्याकडे आली. तेव्हा नरसिंहराव यांनी तयार केलेल्या मार्गावरून आम्ही पुढे जाऊ’, असे वाजपेयी यांनी जाहीरपणे सांगितले होते. असे राजकारणातील काही आदर्श पण अपवादात्मक उदाहरणे आहेत, असेही त्या म्हणाल्या.

ताबडतोब दिल्लीला या -
बाबासाहेब परांजपे फाऊंडेशनच्या रौप्य महोत्सवाच्या समारोप सोहळ्यासाठी सुरभी वाणी देवी या रविवारी (ता. २४) लातुरात दाखल झाल्या. येथील दयानंद महाविद्यालयाच्या सभागृहात सायंकाळी पाच वाजता हा सोहळा होणार होता. पण लातुरात आल्यानंतर काही तासांतच त्यांना दिल्लीहून एक दुरध्वनी आला आणि ‘ताबडतोब दिल्लीला या’, असा निरोप मिळाला. त्यामुळे त्या या सोहळ्याला उपस्थित न राहता तातडीने रवाना झाल्या. पण तो नेमका दूरध्वनी कोणाचा होता, हे मात्र वाणी देवी यांनी गुलदस्त्यात ठेवले.

‘‘चौकीदार चोर हैं, अशी घोषणा दिली जात असली तरी प्रत्येक व्यक्तीला विरोधक असतात आणि त्यांचे कौतूक करणारेही असतात. पण व्यक्तीगत टीका होऊ नये, असे मला वाटते.’’ - सुरभी वाणी देवी
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com