महापालिकेचे पावणेपाच कोटी द्या! 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 जून 2018

औरंगाबाद - सातारा - देवळाई भागातील नागरिकांनी विकास शुल्कापोटी भरलेल्या रकमेपैकी चार कोटी ८० लाख रुपये सिडकोने कपात केले होते. ही रक्कम महापालिकेला परत मिळावी, यासाठी महापौर नंदकुमार घोडेले यांनी मंगळवारी (ता. १२) सिडकोचे प्रशासकीय अधिकारी ओमप्रकाश बकोरिया यांची भेट घेतली. रक्कम देण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्‍वासन बकोरिया यांनी दिले. 

सातारा - देवळाई परिसर दोन वर्षांपूर्वी महापालिकेत समाविष्ट करण्यात आला आहे. त्यानुसार या भागात रस्ते, पथदिवे बसविण्याची कामे महापालिकेमार्फत केली जात आहेत. या भागातील नागरिकांनी बांधकाम परवाने घेताना विकास शुल्कापोटी सिडकोकडे रक्कम भरलेली होती. त्यापोटी एकूण १३ कोटी रुपये महापालिकेला मिळणे अपेक्षित होते; मात्र ४ कोटी ८० लाख रुपये सिडको नाट्यगृहाची दुरुस्ती व इतर कामापोटी कपात करून उर्वरित रक्कम सिडकोने महापालिका दिली. या निधीतूनच रस्त्यांची कामे करण्यात येणार असून, त्यासाठी सध्या निविदा प्रक्रिया अंतिम झाली आहे. निधी कपात करताना सिडकोने महापालिकेला विश्‍वासात घेतले नव्हते. त्यामुळे कपात केलेला निधी मिळविण्यासाठी महापालिकेचे प्रयत्न सुरू आहेत. 

दरम्यान, मंगळवारी महापौर नंदकुमार घोडेले यांनी सिडकोचे प्रशासकीय अधिकारी ओमप्रकाश बकोरिया यांची भेट घेऊन महापालिकेला ४ कोटी ८० लाखांचा निधी मिळाल्यास सातारा - देवळाई भागात विकासकामे करता येतील, असे स्पष्ट केले. त्यावर बकोरिया यांनी कपात केलेला निधी परत देण्यासाठी प्रयत्न करतो, असे आश्‍वासन दिल्याचे श्री. घोडेले यांनी सांगितले.

Web Title: Give the municipal corporation Rs five crore