Loksabha 2019 : पाणी द्या, अन्यथा मतदानावर बहिष्कार ! 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 एप्रिल 2019

  • ​औरंगाबादेत पाच दिवसाआड अवेळी मिळते पाणी 
  • मतदान न करण्याचा संतप्त महिला, नागरिकांचा इशारा

लोकसभा 2019
औरंगाबाद : पाच दिवसाआड तेही अवेळी, अपुरे पाणी मिळत असल्याने संतप्त झालेल्या सिडको एन-सहा भागातील महिला, नागरिकांनी लोकसभा निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा बुधवारी (ता. 17) दिला. नगरसेविका पतीने आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन समजूत काढल्यानंतर नागरिकांनी माघार घेतली. 

शहरात गेल्या काही महिन्यांपासून तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे. विशेषतः सिडको-हडको भागातील नागरिक त्रस्त आहेत. पाच-सहा दिवसाआड तेही रात्री अपरात्री नळाला पाणी येत आहे. हे पाणी देखील अपुरे असते. त्यामुळे नागरिकांचे वारंवार आंदोलने सुरू आहेत. सिडको एन-6, जे सेक्‍टरमधील संतप्त झालेल्या महिला, नागरिक बुधवारी रिकामे हंडे घेऊन दुपारी गंगाधर वेताळ, श्री. विठोरे यांच्या मार्गदर्शनाखाली हनुमान मंदिराजवळ जमा झाले. वेळेत आणि मुबलक पाणी द्या, अन्यथा लोकसभा निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकण्यात येईल, असा पवित्रा त्यांनी घेतला.

Web Title: Give water otherwise boycott of voting demands common man in aurangabad