'ते' देतात गणेशमूर्ती चक्क मोफत! (व्हिडिओ)

अतुल पाटील
बुधवार, 28 ऑगस्ट 2019

एकदंत गणेशालयातर्फे अनाथाश्रम, बालिकाश्रम, गतिमंद, मतिमंद, मूकबधिर, अंध मुलांच्या शाळा, वसतिगृहांसाठी 500 रुपयांपर्यंतची गणेशमूर्ती मोफत देण्यात येणार आहे.

औरंगाबाद : महागाईच्या या जमान्यात आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचा उत्सव कसा साजरा साजरा करायचा, असा प्रश्न तुम्हाला पडला अंसेल, तर एक काम करा तुम्ही काही तरी समाजोपयोगी, विधायक गोष्ट करा, तुम्हाला गणेशमूर्ती चक्क मोफत किंवा सवलतीच्या दरात मिळेल. औरंगाबादमधील एकदंत गणेशालय हा उपक्रम राबवत आहे.

विशेष म्हणजे एकदंत गणेशालयातर्फे अनाथाश्रम, बालिकाश्रम, गतिमंद, मतिमंद, मूकबधिर, अंध मुलांच्या शाळा, वसतिगृहांसाठी 500 रुपयांपर्यंतची गणेशमूर्ती मोफत देण्यात येणार आहे.

गणेशालयातर्फे औरंगाबादेत सात वर्षांपासून हा उपक्रम राबवला जातो. गणेश मूर्तीच्या विक्रीतून इतर सामाजिक उपक्रम हाती घेतले जातात. यात शहरातील मेघालय, उत्तरांचल येथील मुलींसाठीच्या वसतिगृहात वॉटरफिल्टर, पिठाची गिरणी देण्यात आली. तसेच गणेश मंदिरात सीसीटीव्हीसाठी पैसे देण्यात आले. ज्या संस्थेला 500 रुपयांपर्यंतची गणेश मूर्ती मोफत हवी आहे त्यांनी संस्थेच्या लेटर हेडवर सही, शिक्‍क्‍यासह मागणी नोंदविण्याचे आवाहन केले आहे. 

राष्ट्रनिर्मितीत प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष हातभार लावणाऱ्या व्यक्‍ती, कुटुंबासाठी अभिनव सूट देण्यात येणार आहे. यासाठी मालमत्ता कर, पाणी बिल नियमित भरणे, जलफेरभरण, घरगुती खतनिर्मिती करणार; तसेच सोलर सिस्टीम बसविणाऱ्याला 10 टक्‍के सूट देण्यात येणार आहे. एक अपत्य आणि कुटुंब नियोजन तसेच गॅस सबसिडी दान करणाऱ्या कुटुंबास 20 टक्‍के सवलत देण्यात येणार आहे.

यासोबतच इकोफ्रेंडली गणपती घरी आणण्यासाठी लोकांना प्रोत्साहन देण्यात येत आहे. यासाठी श्रीकांत देशपांडे, मनोज व्यवहारे, संजय निंबेकर हे प्रयत्न करीत आहेत. अधिक माहितीसाठी सिडको, एन-पाच येथील चिश्‍तिया पोलिस चौकीसमोरील एकदंत गणेशालयात संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. 

आम्ही समाजजागृतीसाठी उपक्रम राबवतो. माहितीपत्रकाद्वारे जागृती करतो. शाडू मातीचीच गणेशमूर्ती का? याचे महत्त्व पटवून देण्याचे काम आम्ही करतो. -मनोज व्यवहारे 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Giving free Shri Ganesha statue